नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): उंटवाडी भागातील जगतापनगरमध्ये राहणारी दिव्या त्रिपाठी (११) ही शाळकरी मुलगी नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. २५) सकाळी आठ वाजता उपेंद्रनगर येथील इंग्रजी शाळेत आली. तिने इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेश केला अन् चक्कर आल्याने जमिनीवर कोसळली. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दिव्याला मयत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिडकोतील उपेंद्रनगर भागात असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दिव्या इयत्ता सहावीत शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती मंगळवारी स्कूल व्हॅनने शाळेत पोहोचली. यानंतर वर्गात आल्यानंतर काही मिनिटांनी तिला चक्करचा त्रास होऊ लागला व ती जमिनीवर कोसळली.
शाळेतील शिक्षकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी त्वरित दिव्याला वाहनातून जिल्हा शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल केले; मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. दिव्या ही अत्यंत मनमिळाऊ स्वभावाची हुशार विद्यार्थिनी होती.
याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेने दिवसभर शाळेत व जगतापनगर भागात हळहळ व्यक्त केली गेली. दिव्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
व्हिसेरा राखून ठेवला:
शवविच्छेदनानंतर दिव्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड शवविच्छेदन पूर्ण करत मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविला आहे; मात्र व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. व्हिसेरा तपासणीसाठी पाठविला जाणार असून, त्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, असे अंबड पोलिसांनी सांगितले.