नाशिक (प्रतिनिधी): एकीकडे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा दहाव्या बळीची नोंद झाली आहे. निफाडमधील एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो स्वाइन फ्लूबाधित असल्याचा अहवाल आला आहे. दरम्यान, नाशिक शहरात जून महिन्यात स्वाइन फ्लूचे पाच बाधित सापडले असून ग्रामीण भागातून शहरात उपचार घेणारा एक बाधित असल्यामुळे एकूण बाधितांची संख्या सहा इतकी झाली आहे.
अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. सध्या दमट वातावरण असले तरी, स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत शहरात स्वाइन फ्लूचे २३ बाधित रुग्ण आढळून आले होते. मात्र कोणीही मयत झाले नव्हते, मात्र एप्रिलमध्ये जेलरोड येथील ५९ वर्षीय डॉक्टरचा या आजारामुळे मृत्यू झाल्यानंतर आतापर्यंत १० जणांचा बळी गेला आहे.
सिन्नरमधील दातली गाव येथील एका ६३ वर्षीय महिला, मालेगाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती तसेच २९वर्षीय महिला, निफाड येथील ६८ वर्षीय महिला, कोपरगाव येथील ६५ वर्षीय महिला तसेच नाशिकमधील जेलरोड भागातील ५८ वर्षीय सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. पाठोपाठ दिंडोरीतील ४२ वर्षीय महिला आणि चांदवड तालुक्यातील तिसगाव भागातील ५० वर्षीय व्यक्तीचा या आजाराने बळी घेतला. आता २० जून रोजी निफाड तालुक्यातील शिरवाडे येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यु झाला. विशेष म्हणजे तो मयत झाल्यानंतर अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे.