नाशिक। दि. २४ जुलै २०२५: प्रभाग २४ मधील रस्ते खड्डे बुजवून दुरुस्त करा, सुरळीत व पुरेसा पाणी पुरवठा करा, यासह विविध मागण्यांचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने गुरुवारी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना दिले.
गोविंदनगर, बडदेनगर, पांगरे मळा, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्कसह संपूर्ण प्रभागातील खड्डे त्वरित बुजवा, सुरळीत व पुरेसा पाणी पुरवठा करा, उद्याने व जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था थांबवा, कर्मयोगीनगर येथील नवीन जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू करा, नैसर्गिक नाल्यांचे सर्वेक्षण करून अतिक्रमीत बांधकामे हटवा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना करा, बांधकाम प्रकल्पांचा रस्त्यांवर येणारा राडारोडा हटवा, पावसाळी गटारची दुरुस्ती करा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
रणभूमी ते भामरे मिसळ रस्त्याचे टेंडर निघूनही निधीअभावी काम थांबल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनाही याबाबत सूचना दिल्या. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, सतिश मणिआर, किरण काळे, अश्विनी मणिआर, मयुर ढोमणे, अरुण भालेराव, तुकाराम सोनवणे आदी हजर होते.