
नाशिक। दि. २४ जुलै २०२५: येत्या ऑगस्ट महिन्यात नाशिकमध्ये होऊ घातलेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, कवी, भाषा अभ्यासक, नागपूर येथील डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन बाबुराव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतीश बोरा, सरचिटणीस सुभाष सबनीस यांनी संयुक्त पत्रकाद्वारे केली आहे.
कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या कार्यकारिणी सभेमध्ये या विषयावर चर्चा होवून सर्वानुमते श्रीपाद जोशी आणि ॲड. नितीन ठाकरे यांची निवड करण्यात आली. या सभेला उपाध्यक्ष दिलीप बारवकर खजिनदार जयप्रकाश मुथा विश्वस्त श्रीमती सुहासिनी वाघमारे, शिरीष देशपांडे, प्रकाश शिंपी, नंदकिशोर ठोंबरे हे उपस्थित होते. लवकरच परिषदेच्या कार्यक्रमाचे नियोजन तसेच कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्यासाठी नाशिकमधील सर्व साहित्य, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी, भाषा अभ्यासक, मराठीचे प्राध्यापक यांची संयुक्त विचारसभा आयोजित करण्यात येणार आहे. ही संयुक्त सभा स्वागताध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, असे संस्थेचे सरचिटणीस सुभाष सबनीस यांनी कळविले आहे.
शनिवार दि. ९ ऑगस्ट आणि रविवार दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृह आणि मॅनेजमेंट कॉलेजच्या प्रांगणामध्ये सदरची परिषद होणार आहे. या दोन दिवसीय परिषदेमध्ये भारतातील ज्येष्ठ विचारवंत, मराठी भाषेचे अभ्यासक, तत्त्ववेत्ते हे उपस्थित राहून भाषाविषयक समाज जागृती संदर्भात विचार मंथन करणार आहेत.
मराठी भाषेसाठी पहिली परिषद :
मराठी भाषेला अभिजात भाषेचा साज मिळाला खरा; परंतु मराठी राजभाषा, ज्ञानभाषा, व्यवहार भाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठी भाषा आणि संस्कृती या संदर्भामध्ये आणि एकूणच मराठी भाषेचा विविधांगी सविस्तर अभ्यास व्हावा, यावर सखोल विचार मंथन व्हावे म्हणून नाशिक येथे कुसुमाग्रज मराठी विचार मंच यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक अशी पहिली अखिल भारतीय मराठी भाषा-संस्कृती परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.
थोडक्यात परिचय:
👉 श्रीपाद भालचंद्र जोशी: गेली अनेक वर्षे मराठी भाषा चळवळीचे काम. विविध मार्गाने मराठी भाषा सुदृढ करण्यासाठी सतत प्रयत्नरत. शासनाच्या मराठी भाषा समितीचे सदस्य. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष.
👉 ॲड. नितीन ठाकरे: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे नाशिक जिल्हा प्रतिनिधी. नाशिक वकील संघाचे अध्यक्ष. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नाशिक जिल्हा केंद्राचे अध्यक्ष. मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकचे सरचिटणीस. ७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सल्लागार. नाशिक शहर नगरविकास रचना आणि अन्याय निवारण समितीचे सेक्रेटरी.