नाशिक (प्रतिनिधी): मिठाई विक्रीची दुकाने सजली असून, दिवाळीत निरनिराळ्या प्रकारच्या मिठाईला खूप मागणी असते. मात्र मिठाईत या दिवसात भेसळ केली जाते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक तर होतेच शिवाय भेसळयुक्त मिठाईमुळे आरोग्याचा प्रश्नही उभा राहतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने मिठाई विक्रेत्यांची बैठक घेऊन ‘मिठाईत भेसळ कराल, तर तुरुंगाची हवाच खाल’ असा इशारा दिला आहे. शहर व जिल्ह्यातील दुकानांमधील मिठाईचे नमुने केव्हाही घेतले जातील. त्यामुळे मिठाई विक्रेत्यांनाही जरा जपूनच रहावे लागेल.
विविध प्रकारची, चविष्ट आणि आकर्षक मिठाई घेण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) देखील खवा, मावा व मिठाईच्या शुद्धतेवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. दर्जेदार, सकस आणि मिठाई मिळावी, यासाठी एफडीएने आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एफडीएची पथके शहरातील मिठाई विक्रेते, खवा मावा विक्रेते, मिठाई उत्पादकांवर लक्ष ठेवणार असून, अन्न व्यावसायिक व मिठाई उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या परवाना अटीचे उल्लंघन होता कामा नये, अन्नविषवाधासारखा अनुचित प्रकार घडणार नाही. त्यासाठी काय करावे आदींबाबत मिठाई उत्पादकांना सूचना देण्यात आल्या. विभागाचे सह. आयुक्त म. ना. चौधरी यांनी बैठकीत मिठाई विक्रेत्यांना कडक इशारा दिला. दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांसाठी टोल फ्री क्रमांक: १८००२२२३६५ वर तक्रार करावी.