नाशिक। दि. २२ सप्टेंबर २०२५ : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पावसाने शहरातील उत्सवाच्या आनंदावर विरजन टाकले. सोमवारी सायंकाळी साडेपाच ते साडेआठ या वेळेत नाशिकमध्ये तब्बल ३७.४ मिमी पाऊस झाला.
अचानक आलेल्या या पावसामुळे दांडिया-गरबाच्या कार्यक्रमांमध्ये अडथळा निर्माण झाला, तर मंदिर परिसरातील भाविकांसह कालिका यात्रोत्सवातील व्यापाऱ्यांना आपापले साहित्य सुरक्षित करण्यासाठी धावपळ करावी लागली.
मे ते सप्टेंबर या पावसाळी हंगामात आतापर्यंत ११३ दिवस पाऊस झाल्याची नोंद असून, शहरातील एकूण पर्जन्यमान ९०० मिमीवर पोहोचले आहे. सोमवारी दिवसभर ऊन असतानाही सायंकाळी अचानक जमलेल्या ढगांमुळे मुसळधार सरी बरसल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. आज म्हणजेच मंगळवारी नाशिक जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, आगामी तीन दिवस यात्रा आणि गरबाच्या कार्यक्रमांवर पावसाचे सावट राहण्याची शक्यता आहे.
![]()

