नाशिक (प्रतिनिधी): उद्योगांबरोबरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने शहरातील हॉटेल्स व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रदूषण नियमांचे पालन न करणाऱ्या नामांकित हॉटेल्सला क्लोजर नोटिसा बजावल्या आहेत. अशा प्रकारची कारवाई प्रथमच होत असल्याने हॉटेल्स व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंटची पाहणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत सांडपाण्याबरोबरच कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील १४ नामांकित हॉटेल्स, एक सर्व्हिस सेंटर आणि माळेगाव येथील एक रासायनिक कारखाना अशा १६ आस्थापनांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) क्लोजर नोटिसा बजावल्या आहेत.
सातपूर, अंबडसह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग आणि कोटिंग उद्योगांवर यापूर्वी वेळोवेळी एमपीसीबीने कारवाई केली आहे. रासायनिक उद्योगांनी नियमांचे पालन करावे. नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही कारवाई केली जाईल असा इशारा एमपीसीबीने दिला आहे.