नाशिक(प्रतिनिधी): पंचवटी परिसरात सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या कुटील हेतूने आक्षेपार्ह मजकूर लिहिलेले पत्रके शनिवारी मध्यरात्री वाटप करण्यात आल्याने सकाळपासूनच परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली होती. पंचवटी भागात शहर पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत पोलिसांनी एक प्रेस नोट जारी केली आहे. यात म्हंटल्याप्रमाणे: “पंचवटी पोलीस ठाणे हददीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल या अनुषंगाने छापीव पत्रके टाकण्यात आले होते. सदर पत्रकावर एका व्यक्तीचा फोटो व नाव नमुद होते. परंतु पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटो मधील व्यक्तीचा काही संबध नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी याने तयार केलेल्या पत्रकामधुन दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे हा उददेश नसुन पत्रकामध्ये नमुद असलेला व्यक्ती व मुख्य आरोपी यांच्या मध्ये वैयक्तीक वाद असुन सदर पत्रकावर छापण्यात आलेल्या फोटो मधील इसमाला त्रास व्हावा या उददेशाने पत्रके तयार करून टाकण्यात आली होती. सदर प्रकरणी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी विरूध्द सबळ पुरावे मिळुन आले असुन त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.”
आयुक्तालयाकडून सर्व नाशिककरांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या मुख्य संशयिताने हा प्रकार केला त्यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्व समाजबांधवांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केले आहे.
![]()

