ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीसह दोन दिवस विविध कार्यक्रम
नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासनाचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग, सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांच्या सहकार्याने नाशिक शहरातील मु. श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे २७ व २८ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिवस व नाशिक ग्रंथोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप यांनी ही माहिती दिली आहे.
ग्रंथ दिंडीने या महोत्सवाची सुरुवात होईल. गुरुवार २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजता प. सा. नाट्यगृह, सार्वजनिक वाचनालय, टिळक रोड, नाशिक येथे दिंडीचे उदघाटन होईल. त्यानंतर ११ वाजता ग्रंथोत्सव, अक्षरबाग बाल साहित्य मेळाव्याचे उदघाटन होईल. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उदघाटन होईल. कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे हे अध्यक्षस्थानी असतील, तर अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष उपस्थिती असेल.
ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी दीड वाजता अक्षरबाग बालसाहित्य मेळावा मु. श. औरंगाबादकर सभागृहात होईल. त्यात दुपारी १.३० ते २.४५ या कालावधीत विद्यार्थी परिसंवाद, दुपारी ३ ते ४.१५ या कालावधीत साहित्यिकांशी गप्पा, सायंकाळी ६ वाजता कल्पनेच्या तीराकडील कुसुमाग्रजांचे यथार्थ दर्शन घडविणारा संवाद सोहळा होईल. त्यात वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘वाटेवरच्या सावल्या’ त संहिता दत्ता पाटील यांची असेल, तर दिग्दर्शक सचिन शिंदे असतील. शुक्रवार २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आठवणीतील कुसुमाग्रज हा कार्यक्रम होईल. अपर्णा क्षेमकल्याणी, नीलेश गायधनी, पंकज क्षेमकल्याणी सादर करतील, तर कीर्ती भवाळकर नृत्य सादर करतील. दुपारी १२ वाजता प्रा. डॉ. प्रमोदकुमार हिरे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती’ याविषयावर व्याख्यान होईल. दुपारी २.३० वाजता मयूर देशमुख हे ‘ग्रंथ हेची संत’ याविषयावर भारुड आत्मप्रबोधनपर कार्यक्रम सादर करतील. दुपारी 4.30 वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप सोहळा होईल.
या ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विक्री मु. श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय, नाशिक येथे सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत खुली राहील. या महोत्सवासाठी सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून या समितीत सदस्य म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अजय शहा, साहित्य परिषदेचे उन्मेष गायधनी, जिल्हा प्रकाशक संघटनेचे वसंतराव खैरनार हे सदस्य तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप हे सदस्य सचिव आहेत. याशिवाय ‘सावाना’चे कार्याध्यक्ष ॲड. अभिजित बगदे, प्रमुख सचिव देवदत्त जोशी, सहसचिव जयेश बर्वे, सांस्कृतिक कार्य सचिव संजय करंजकर, बालभवनप्रमुख प्रा. सोमनाथ मुठाळ यांचे विशेष साहाय्य लाभले आहे. नागरिकांनी या ग्रंथ महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
तसेच खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजित तांबे, आमदार पंकज भुजबळ, आमदार छगन भुजबळ, आमदार देवयानी फरांदे, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बोरसे, आमदार दिलीपराव बनकर, आमदार सुहास कांदे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, आमदार मुफ्ती मोहम्मद ईस्माइल अब्दुल खालिक, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगरू संजीव सोनवणे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, ‘सावाना’चे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, वरीष्ठ जिल्हा कोशागार अधिकारी महेश बच्छाव, अपर कोशागार अधिकारी रमेश शिसव प्रमुख पाहुणे असतील.