नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आयुक्तालय हद्दीमध्ये विविध कलमान्वये निर्बंधांचे आदेश जारी केले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू केली आहे.
२५ नोव्हेंबरपर्यंत असलेल्या या आचारसंहितेदरम्यान, आयुक्तालय हद्दीमध्ये शांतता, निर्भय व न्यायपूर्ण वातावरणात निवडणुकीची प्रक्रिया पार पडण्यासाठी आयुक्त संदीप कर्णिक यांनी विविध कलमान्वये आदेश जारी केले आहे.
या आदेशानुसार, आयुक्तालय हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिरांचे वा मेळाव्यांचे आयेाजन करण्यावर निर्बंध राहणार आहेत. तसेच, शहरात ठिकठिकाणी अनधिृकतरित्या होर्डिंग्ज्, बॅनर्स, पोस्टर्स वा भिंतींवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण केले जाते. निवडणूक काळातही राजकीय पक्ष व पक्षांशी संबंधितांकडून असे फलकबाजी करण्याची शक्यता आहे आचारसंहिता काळात शासकीय, निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरुपात विदुपीकरण करण्यात मनाई करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, आचारसंहिता लागू असेपर्यंत शहर आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये शासकीय, निमशासकीय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर धरणे आंदोलन, मोर्चो, निदर्शने, उपोषण करण्यावर आयुक्तांनी निर्बंध घातलेले आहेत. तसेच, निवडणूक प्रचार काळात प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे आदींसंदर्भातील बंधने घालण्यात आली आहेत.
अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांचाच वापर निवडणूक प्रचारामध्ये संबंधित पक्ष वा उमेदवारांना करता येणार आहे. तसेच, निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही जागा, इमारत, आवार, भिंतीचा वापर करण्यासाठी संबंधित राजकीय पक्ष वा उमेदवाराने जागा मालकाची परवानगी शिवाय वापर करू नये.
शहरातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरते पक्ष कार्यालये स्थापन करण्यासही आयुक्तांनी निर्बंध घातले आहेत.
निवडणूक काळासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणूकींसाठी पोलीस परवानगी बंधनकारक आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
परवाना शस्त्र बाळगण्यास मनाई:
आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील शस्त्र परवानाधारकांना शस्त्र, अगिशस्त्र सोबत बाळगण्यास मनाई करण्यात येत आहे. प्रचार, रोड शो, सभा, रॅली याप्रसंगी शस्त्र बाळगू नये. सदरचे आदेश २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपर्यत लागू आहेत.