नाशिक: बहिणीच्या मेहंदी कार्यक्रमात नाचताना भावाचा मृत्यू

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): चुलत बहिणीच्या लग्नसोहळ्यानिमित्त पूर्वसंध्येला मेहंदीचा कार्यक्रम शनिवारी रंगात आलेला असताना डीजेच्या तालावर नाचणाऱ्या नववधूचा ३१ वर्षीय भाऊ अजय ऊर्फ चिंटू दिलीप डहाळे हा अचानकपणे जमिनीवर कोसळला, यावेळी सर्वांनी त्याच्याजवळ धाव घेतली. त्याला पाणी पिण्यासाठी दिले अन् त्याचवेळी त्याची प्राणज्योत मालवली.

लग्नाच्या मंगलसोहळ्याच्या आनंदात सर्वजण असतानाच ऐन लग्नमंडपात घडलेल्या या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जेलरोड पंचकगाव सायट्रिक येथील संतोष व दिलीप डहाळे या दोघा भावांचे एकत्रित कुटुंब वास्तव्यास आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: आजपासून बेशिस्त रिक्षांवर पोलिसांची 'ऑटो रिक्षा शिस्त मोहीम'

संतोष डहाळे यांच्या कन्येचा उद्या रविवारी (दि.१७) विवाह सोहळा असल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. बहिणीच्या लग्नाची सर्वांनी जोरदार तयारी केली होती. रविवारी लग्न असल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी मेहंदीचा कार्यक्रम अंगणात उत्साहात सुरू होता. यावेळी डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली मृत्यू

यादरम्यान, अजयदेखील नृत्याचाच आनंद घेत होता. अचानकपणे त्याला भोवळ आली आणि अस्वस्थता जाणवू लागली अन् काही क्षणातच तो जमिनीवर पडला. हे बघून सारेच त्याच्याजवळ धावले. यावेळी बेशुद्ध पडलेल्या अजयला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते, तोपर्यंत अजयने या जगाचा निरोप घेतला होता.

अजयच्या मृत्यूने लग्नघरी शोककळा पसरली. डहाळे कुटुंबीयांना या अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. अजयच्या जाण्याने लग्नाचा आनंद दुःखात रूपांतरित झाला. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: हॉटेल गोळीबार प्रकरणी लोंढे टोळीचा फरार संशयित जेरबंद

जेलरोड दसक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अजयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, काका, काकू, दोन चुलत बहिणी असा परिवार आहे. यावेळी डहाळे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here