नाशिक। दि. १६ जुलै २०२५: नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे सन २०२६- २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. हा कुंभमेळा हरित कुंभ म्हणून होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे. या उपक्रमात प्रत्येक नागरिकाने सहभागी होत वृक्षारोपण करून हरित कुंभसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी येथे केले.
जिल्हा प्रशासनातर्फे आज सकाळी चामर लेणी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (प्रशासन), सीमा अहिरे (रोहयो), रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, महेश जमदाडे, अभिजित नाईक, तहसीलदार अमोल निकम, श्याम वाडकर, वैशाली आव्हाड, माधुरी आंधळे, सुनीता जऱ्हाड, नायब तहसीलदार डॉ. अमित पवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले की, ‘हरित कुंभ’ या संकल्पनेत सर्व शासकीय विभागांचा सहभाग असणार आहे. नाशिक जिल्ह्यास निसर्ग सौंदर्य भरभरून लाभले आहे. या सौंदर्यात प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून भर घालावी. नागरिकांनी रोपांची लागवड करतानाच त्यांच्या संवर्धनाचीही जबाबदारी घ्यावी. वृक्षारोपण करून त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येईल. तसेच ‘माझा कुंभ- माझी जबाबदारी, माझा वृक्ष- माझी जबाबदारी’ ही संकल्पना पूर्णत्वास आणावी, असेही आवाहन त्यांनी केले. उपजिल्हाधिकारी श्रीमती अहिरे यांनी सांगितले की, आजच्या दिवशी जिल्हाभरात शासकीय अधिकारी व कर्मचारी वृक्षारोपण करीत आहेत. तसेच या रोपांच्या संवर्धनाचीही जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.