🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

नाशिक: तिडके कॉलनीतील मिलिंदनगरची अतिक्रमणे जमीनदोस्त

नाशिक, दि. १४ फेब्रुवारी २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा ताण कमी करण्यासाठी नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाने तिडके कॉलनी परिसरातील मिलिंद नगर भागात मोठी कारवाई केली. शुक्रवारी (दि. १३) सकाळी सुमारे ९ वाजता सुरू झालेल्या मोहिमेत तब्बल २७ घरे जमीनदोस्त करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: महाशिवरात्रीनिमित्त कपालेश्वर मंदिर २४ तास खुले; व्हीआयपी दर्शन बंद

कारवाईसाठी महापालिकेच्या पश्चिम, पूर्व, पंचवटी, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने सिटी सेंटर सर्कल परिसरातील आर. डी. सर्कल ते मायको सर्कलदरम्यान नंदिनी नदीवर नवीन पूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी सुमारे १०० फूट रुंदीचा रस्ता विकसित होणार असून, त्यासाठी अडथळा ठरणारी झोपडपट्टी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा: पार्किंग जागांची महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे तातडीने भौतिक पाहणी

महापालिकेकडून संबंधित रहिवाशांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. काही नागरिकांनी स्वखुशीने घरातील साहित्य बाहेर काढले; तर काही भावनिक झाले. लहान मुलांचे रडणे, महिलांचा आक्रोश आणि वृद्धांची हतबलता यामुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.

कारवाईदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस दलही सज्ज ठेवण्यात आले होते. सिंहस्थपूर्व पायाभूत सुविधा विकासाच्या कामांना गती देण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790