
नाशिक । दि. १३ मे २०२५: नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर शरणपूर सिग्नलजवळ आज (दि. १३) दुपारी चालत्या वाहनांवर झाड कोसळल्याने दोन चारचाकी आणि एका रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नाशिक-त्र्यंबकरोड हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळण्याचे प्रकार सुरु आहेत. सोमवारी सातपूरला चालत्या दुचाकीवर झाड कोसळून दोन मित्रांचा मृत्यू झाला होता. अशातच मंगळवारी (दि. १३) त्र्यंबकरोडवर चालत्या वाहनांवर झाड कोसळले. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटना घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी वाहनांमधील लोकांना सुखरूप बाहेर काढले. घटनेनंतर लगेचच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रहदारीच्या रस्त्यावर झाड पडल्यामुळे ट्राफिक जाम झाला होता. यंत्रणेकडून पडलेले झाड काढण्याचे प्रयत्न लगेच सुरु झाले.