नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी (१२ मे) दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत झाड कोसळून दोन तरुण मित्रांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गौरव भास्कर रिपाटे (वय २१) आणि सम्यक नीलेश भोसले (वय २०) दोघेही रा. रमाबाई आंबेडकरनगर, देवळाली गाव) यांचा समावेश आहे.
गौरव आणि सम्यक हे दोघेही जिवलग मित्र होते. दोघांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून महिंद्रा कंपनीमध्ये ५ डिसेंबर २०२४ पासून प्रशिक्षणार्थी म्हणून काम सुरू केले होते. सोमवारी नेहमीप्रमाणे गौरवच्या दुचाकीवरून कंपनीकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.
दुपारच्या सुमारास सातपूरमधील कामगार रुग्णालयाच्या मागील रस्त्यावरून जात असताना अचानक आलेल्या वादळ आणि पावसामुळे एक जुना व ठिसूळ गुलमोहर वृक्ष त्यांच्यावर कोसळला. झाडाच्या फांद्यांखाली दाबले गेल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दल, पोलीस व रुग्णवाहिकेला पाचारण केले. सातपूर अग्निशमन केंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढले आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, गौरवला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर सम्यकचा रात्री खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या हृदयद्रावक घटनेने देवळालीगाव परिसरात शोककळा पसरली आहे. शहरातील जुन्या व ठिसूळ प्रजातीच्या झाडांमुळे वाढलेल्या धोक्याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित वृक्षांच्या छाटणी व व्यवस्थापनाची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
![]()

