
नाशिक, 13 मे 2025: रविवारी झालेल्या पावसानंतर सोमवारी (दि. १२) पुन्हा एकदा नाशिक शहर आणि उपनगरांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. दुपारी दोन वाजल्यापासून सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. ढगांच्या गडगडाटासह आलेल्या या पावसात ५.६ मिमी इतकी नोंद झाली. त्यानंतर सायंकाळी चार ते साडेपाच या वेळेत पंचवटी, मेरी व म्हसरूळ परिसरात पावसाचा जोर अधिक वाढला. रात्री आठ वाजता शहरातील काही भागांत पुन्हा पावसाने हजेरी लावली. दिवसअखेर एकूण २१ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने याआधी सोमवारीपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. मात्र दुपारनंतर परिस्थितीच्या बदलत्या स्वरूपामुळे तो ‘ऑरेंज अलर्ट’मध्ये बदलण्यात आला. पावसासोबतच वादळी वाऱ्यांचा जोर जाणवला. विशेषतः सातपूर आणि मध्यवर्ती शहर भागात ताशी २० ते २५ किमी वेगाने वारे वाहू लागले. सातपूर परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. एन. डी. पटेल रोडवर गुलमोहराचे मोठे झाड कोसळल्यामुळे महावितरणच्या तीन वीज पोल्सवर परिणाम झाला.
या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. दूध बाजार, दहीपूल, सरस्वती लेन, कानडे मारुती लेन, सराफ बाजार, मेन रोड, भद्रकाली मार्केट या भागांमध्ये पाणी साचले होते. गटारी रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सराफ आणि फुल बाजार परिसरात पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून जात असल्याचे चित्र दिसले.
पुढील दोन दिवस यलो अलर्ट कायम:
हवामान विभागाने नाशिकसाठी येत्या बुधवारपर्यंत (दि. १४) पुन्हा ‘यलो अलर्ट’ घोषित केला आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ३५ किमी पर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पाण्याखाली गेलेले भाग:
मुंबई नाका, द्वारका, सारडा सर्कल, मायको सर्कल, सरकारवाडा पोलिस ठाणेसमोर, सराफ बाजार, राका कॉलनी चौक, कोतवाल पार्क रोड, सरस्वती लेन आणि दूधबाजार या सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावासारखे दृश्य निर्माण झाले.
![]()

