
नासिक। दि. १२ डिसेंबर २०२५: गेल्या अडीच दशकांपासून पक्षी, पर्यावरण आणि दुर्ग संवर्धनासाठी एकतानतेने काम करणारे निसर्गवेधी छायाचित्रकार आनंद बोरा यांनी नाशिक सिटीझन्स फोरमचा ‘आऊटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या शनिवारी त्यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असून यावेळी पर्यापूरक अंत्यसंस्कारांना चालना देण्यासाठी फोरमच्या वतीने ‘मोक्ष’ या जनजागृती अभियानाचा प्रारंभही करण्यात येणार आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मनिषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती करिश्मा नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत उंटवाडी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात शनिवारी (दि. १३ डिसेंबर २०२५) सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. योगेंद्र सक्सेना यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभणार असून ते यावेळी पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराबाबत सादरीकरणही करणार आहेत.
अॅड. जयंत जायभावे, डॉ. नारायण विंचूरकर आणि श्रीमती शरण्या शेट्टी यांच्या निवड समितीने या पुरस्कारासाठी श्री. बोरा यांचे नाव निश्चित केले आहे. नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी ‘नाशिक सिटीझन फोरम’तर्फे ‘आउटस्टँडींग सिटीझन ऑफ नाशिक’ हा पुरस्कार दिला जातो.

नेचर क्लब ऑफ नाशिक या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले आनंद बोरा हे नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस वर्षापासून पर्यावरण संवर्धनाचे काम करीत आहेत. महाराष्ट्रातील पहिल्या रामसर दर्जा मिळालेल्या नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात १९९६ पासून ते पक्षी संवर्धनाचे काम करीत आहेत. आतापर्यंत बोरा यांनी पक्षी अभयारण्यातील ३१० जातीच्या पक्ष्यांचे छायाचित्र काढून त्याची यादी देखील तयार केली आहे. भारतीय पक्ष्यांमधील रंग विकृती या विषयावरील त्यांनी काढलेले सिकंदर पोपटाचे छायाचित्र “न्युजलेटर फॉर बर्डवॉचर्स” मध्ये प्रकाशित झाले आहे. त्यावर रिसर्च पेपर देखील प्रसिद्ध झाला आहे. बोरा हे विविध महाविद्यालयात व्याख्याने, स्लाईड शो यांच्या माध्यमातून वन्यजीव संवर्धनाबाबत प्रबोधन करत असतात. देशभरातील छायाचित्रकारांसाठी सर्वोच्च मानांकित समजला जाणारा सँच्युरी एशियाचा आंतराष्ट्रीय स्तरावरील वाईल्ड लाइफ फोटोग्राफी अवार्ड २०१७ आणि २०२२ साली त्यांना मिळला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रथम पारितोषिक देखील मिळाले आहे.
निसर्गवेध मासिकाचे संपादक म्हणून निसर्गाप्रती जागरूकता आणि संवेदनशीलता वाढविण्यासाठी ते कार्यरत असतात. वन्य जीव छायाचित्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरा यांनी आजवर पाच हजार जखमी पक्ष्यांना वाचविले आहे. तसेच वीस हजार पेक्षा जास्त रोपांची लागवड त्यांनी केली आहे. रानमेव्याच्या बिया गोळा करून महाविद्यालयातील युवकांना एकत्रित करून डोंगर हिरवे करण्याचा उपक्रम ते राबवतात. त्याद्वारे त्यांनी नाशिक परिसरातील डोंगर हरित करण्यासाठी एक लाख बियांचे रोपण केले आहे. निर्माल्यातून फुलाकडे या उपक्रमाद्वारे बोरा हे गेल्या तीस वर्षापासून निर्माल्य नदीत न फेकता त्यापासून खत कसे बनविले जाते, याबाबत लोकांचे प्रबोधन करत आहेत. दरवर्षी शाडूमातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा ते आयोजित करतात. ‘चला पक्षी ओळखू या’ नावाच्या उपक्रमातून ते नागरिकांना पक्ष्यांची ओळख करून देत असतात.
बोरा हे दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष असून जिल्ह्यातील गड किल्ल्यांच्या संवर्धानाठी महिन्याला एक किल्ल्यावर या संस्थेद्वारे स्वच्छता मोहीम राबविली जाते. बोरा यांच्या पुढाकारातून आतापार्यंत ६० किल्ल्यावर हि मोहीम राबविली आहे. बोरा यांनी निसर्ग कट्टा या उपक्रमातून नाशिकच्या निसर्गप्रेमींना खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आठ ते दहा वर्षापासून बिबट्या या वन्य प्राण्यावर त्यांचा अभ्यास सुरु असून याबाबत ते पुस्तकही लिहीत आहेत. वसंतातील फुलांचा बहर व वृक्षांची माहिती देणारे ‘वसंत बघू या’ हे प्रदर्शन ते आयोजित करत असतात. गेल्या पंधरा वर्षा पासून महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत, लोकमत टाइम्स, सकाळ, पुढारी,आपलं महानगर आदी वृत्तपत्रांतून ते निसर्ग आणि वन्यजीव याबाबत लिखाण करीत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील १२० गावांची माहिती देणारे ‘माझं नाशिक माझं गाव’ आणि ‘संतबोध’ ही बोरा यांनी लिहिलेलील पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या एका छायाचित्राने दुर्गम आदिवासी भागात लाकडी बल्लीवरून पिण्याच्या पाण्यासाठी प्रवास करणाऱ्या महिलांना लोखंडी पूल बनवून देण्यात आला होता तिथे आणि आठ कोटीच्या योजना देखील मंजूर झाल्या आहेत. बोरा हे दहा वर्षा पासून हरसूल मधील पक्ष्यांवर अभ्यास करत असून त्यांनी आतापर्यंत दोनशे जातीच्या पक्षांची नोंद केली आहे.
कान्हा, बांधवगड, जिम कॉर्बेट, पन्ना, मेळघाट वाघ्र प्रकल्प, तानसा अभयारण्यासह देशभरातील तीस पेक्षा जास्त अभयारण्यात वन विभागाने घेतलेल्या बर्ड सर्वेमध्ये बोरा सहभागी झाले आहेत. नांदूरमध्यमेश्वर, कान्हा, बांधवगड आणि सातपुडा अभयारण्य या परिसरात सहसा न दिसणारे नवीन पक्षी देखील त्यांनी शोधले आहे. नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वीस वर्षापासून पक्ष्यांवर अभ्यास आणि पक्षी गणनेमध्ये बोरा सहभाग घेत आहेत. तसेच पक्षी अभायारण्य परिसरातील गावातील युवकांना पक्षी कसे बघावे याची माहिती देवून त्यांना गाईड बनविण्यासाठी बोरा यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांनी अभयारण्यातील कर्चाऱ्यांसाठी मेडिकल कॅम्पचे आयोजनही केले आहे. विविध शाळांच्या सहली पक्षी अभयारण्यात आणून विद्यार्थांना पक्षी आणि वन्यप्राण्यांबाबत जागरुकता निर्माण करण्याचा बोरा यांचा प्रयत्न असतो.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या यश सेंटर फॉर बायोडायवर्सिटी कंजर्वेशन कमिटीचे सदस्य म्हणून ते काम करीत आहेत. गेल्या दोन वर्षा पासून चुंचाळे गावाजवळील नाशिक पंचवटी पांजरपोळ येथील जैवविविध केंद्रात बर्ड सर्वेही ते करीत आहेत.
![]()
