
नाशिक, दि. १२ मे २०२५: शहरातील पंचवटी कारंजा परिसरात असलेल्या एका जुन्या वाड्यात सोमवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांनी प्रसंगावधान राखून वेळीच मदत कार्य सुरू केल्यामुळे कोणतीही जीवितहानी टळली आहे.

सदर वाड्यात प्रसिद्ध ‘माधवजी का चिवडा’ हे दुकान देखील आहे. दुपारी अचानक आग लागल्याचे दिसून येताच स्थानिकांनी तातडीने अग्निशामक विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले.

सध्या आग लागण्याचे नेमके कारण अस्पष्ट असले, तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत वाड्यातील अनेक घरगुती वस्तू जळून खाक झाल्या असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे कळते.
दरम्यान, आगीच्या घटनेदरम्यान वाड्यातील रहिवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले. रविंद्र दत्तात्रय कापुरे (वय ५४), शितल रविंद्र कापुरे (४३), दीपक दत्तात्रय कापुरे (१३), साई दत्तात्रय कापुरे (९) आणि काजल रविंद्र कापुरे (११) या कुटुंबातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
या बचाव कार्यात पंचवटीतील माजी नगरसेवक उल्हास धनवटे, सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी, किशोर ढगे, दिलीप सातपुते, बंटी वाघ, प्रवीण भाटे, उमेश कोठुळे आणि संजय शिंदे यांनी पुढाकार घेत महत्त्वपूर्ण मदत केली. आग नियंत्रणात आली असली तरी प्रशासनाकडून नुकसानीचा अंदाज घेण्याचे आणि आगीचं मूळ कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
![]()

