बुधवारी महापालिका आयुक्तांची भेट घेणार
नाशिक (प्रतिनिधी): गोविंदनगर येथील इंडिगो पार्क जॉगिंग ट्रॅकच्या जागेत अतिक्रमण होवू नये, यासाठी आज मंगळवारी जॉगर्स ग्रुपने निदर्शने केली. संभाव्य अतिक्रमणाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
इंडिगो पार्क जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचे काम एका बिल्डरच्या कंपनीच्या सीएसआर फंडातून करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. संबंधित बिल्डरने जॉगिंग ट्रॅकलगत प्रवेशद्वाराचे काम सुरू केले आहे. पाटबंधारे खात्याच्या या जागेवर कुठलेही अतिक्रमण होवू नये, यासाठी आज मंगळवारी, १२ मार्च २०२४ रोजी जॉगर्स ग्रुपने निदर्शने व घोषणाबाजी केली.
यानंतर सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), इंजिनिअर रमेश गावीत यांनी महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांच्याशी संपर्क साधला. अतिक्रमण होणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसेच सर्व मागण्यांसंदर्भात बुधवार, दि. १३ मार्च रोजी दुपारी एक वाजेला महापालिका मुख्यालयात रहिवाशांना भेटण्यासाठी वेळ दिली. यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात बाबासाहेब गायकवाड (देशमुख), जी. एम. बाविस्कर, नरेंद्र आघाव, घनश्याम सोनवणे, राजेंद्र वरखेडे, रवी सिंग, प्रकाश वरखेडे, प्रकाश गावले, गणेश शिंदे, शांताराम पगार, आर. पी. धामणे, दशरथ आहेर, व्ही. के. सोनवणे, रवी मूल, दत्ता दळवी, राजेंद्र आहेर, संजीव जाधव, राहुल जैन, रमेश गावीत, आशुतोष मोरे, संजय महाजन, मगन पाटील, सोपान थोरात, अरुण घोरपडे सहभागी झाले होते.
शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा पाठपुरावा:
जॉगिंग ट्रॅकला विरोध नाही. परंतु अतिक्रमण करू नये, यासाठी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, संध्या छाया ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विठ्ठल देवरे यांच्यासह रहिवाशांनी महापालिकेला निवेदने दिली आहेत. अतिक्रमण होणार नाही याची खात्री करावी, यासाठी २४ एप्रिल २०२३, ४ जुलै २०२३ आणि १९ जानेवारी २०२४ अशी तीनवेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, महापालिकेच्या बांधकाम विभाग व नगररचना विभागाने याकडे पद्धतशीर दुर्लक्ष करून बिल्डरधार्जिणे धोरण राबविले आहे, याचाही निषेध करण्यात आला. अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळेच आज जॉगर्सना आंदोलन करावे लागले.