नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाचे १६ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नाशिकरोड येथील न्यायालयाच्या नवीन इमारत येथे या न्यायालयांचे उदघाटन होणार असल्याची माहिती नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुदाम गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उद्घाटन सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, पालक न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती जितेंद्र जैन, न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन आदी उपस्थित राहणार आहेत. हा उद्घाटन सोहळा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नाशिकरोडला सध्या कनिष्ठ स्तर न्यायालय असल्याने दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आणि जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अखत्यारीतील दावे हे नाशिक न्यायालयात दाखल व्हायचे. आता नाशिकरोड न्यायालयाच्या हद्दीतील दिवाणी स्तरावरील ५ लाखांच्या पुढील दावे तसेच अपिले तसेच इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील जिल्हा स्तरावरील अपिले नाशिकरोड न्यायालयात चालविलेजातील.