आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल- राज्यपाल राधाकृष्णन

नाशिक (प्रतिनिधी): देशातील नद्या या अध्यात्मिक प्रेरणा आणि सांस्कृतिक उत्थानाचे केंद्र आहेत. त्यांना प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.  नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीसह नाशिक शहर स्वच्छ आणि सुंदर होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याची वेगळी ओळख निर्माण होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रजीवन पुरस्कार जल व पर्यावरण तज्ज्ञ पद्मश्री महेश शर्मा यांना राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्‍यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार सीमा हिरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष शांताराम भानोसे व नृसिंहकृपा दास, सचिव मुकुंद खोचे, श्रीनिवास लोया आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते गोदापूजन आणि आरती करण्यात आली.

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, लोकसंख्या वाढ आणि औद्योगिकरण यामुळे नद्यांचे प्रवाह दूषित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आज नाशिक येथे गोदावरी काठी आपली परंपरा, संस्कृती पुन्हा आकार घेतेय याचा आनंद आहे. प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असताना पंचवटी येथे गोदाआरतीमध्ये सहभाग ही आनंदाची आणि समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: युवकाच्या खूनप्रकरणी महिलेसह चौघांना जन्मठेप !

नाशिक येथे प्रभू श्रीराम यांनी निवास केल्याने आणि त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र जवळ असल्याने या परिसराला वेगळी ओळख आहे. त्यामुळेच सेवा समितीने सुरू केलेल्या गोदावरी स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यपाल पुढे म्हणाले, नद्यांचे संवर्धन नाही केले तर जीवन बिकट होईल. तिसरे महायुद्धाचे कारण पाणी असेल, असे विचारवंत सांगतात. जगाची लोकसंख्या वाढते आहे. त्यामुळे भविष्यात ही काळजी करण्याची बाब ठरणार आहे. दिल्ली, मुंबई यासह इतर प्रमुख शहरातील प्रदूषण ही आपल्यासाठी धोक्याची सूचना आहे. अशावेळी भारतात असणाऱ्या नद्या ही आपली श्रीमंती आहे.  त्यामुळे नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशातील सर्व नद्या जोडल्या गेल्या पाहिजेत, नदी जोड प्रकल्प राबविले गेले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले की, नाशिकमध्ये विकासाची खूप मोठी क्षमता आहे. नाशिक आणि शिर्डी कॉरिडॉर एकत्र विकसित केला आणि तो रेल्वेने जोडला, तर या विकासाला अधिक गती मिळेल. यासोबतच नाशिक-मुंबई महामार्ग हा सहा पदरी करून विस्तारीकरण केले तर त्याचा लाभ या परिसराच्या विकासाला होणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे झाली, गर्दीचे व्यवस्थापन आणि स्वच्छता याचे नियोजन केले, तर त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल. आपला नाशिक मधील कुंभमेळा सर्वाधिक चांगला होईल, असा विश्वास राज्यपाल महोदयांनी व्यक्त केला. देशाच्या गौरवासाठी आपण आपल्यातील सर्व मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे असेहीराधाकृष्णन म्हणाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगच्या आमिषातून ज्येष्ठ नागरिकाची ९९.५० लाखांची फसवणूक

राष्ट्र जीवन पुरस्कार मिळालेले पद्मश्री महेश शर्मा यांनी पाणी बचत आणि जलसंधारण यासाठी केलेले काम हे युवा वर्गासाठी प्रेरणा असल्याचे नमूद करून महेश शर्मा हे झाबुआचे गांधी आहेत, अशा शब्दात राज्यपाल राधाकृष्णन यांनी त्यांचा गौरव केला.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रहाटकर म्हणाल्या, गोदावरी नदीला मातृ स्वरूप मानून ही समिती काम करीत आहे. सेवेचा उत्तम आदर्श त्यांनी समोर ठेवला आहे. तरुण आणि महिलांचा सहभाग ही महत्वाची बाब आहे. प्रदूषणापासून नदीला संरक्षित करणे महत्वाचे आहे. ते काम येथे होत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चोरीच्या पाच मोटारसायकलींसह आरोपी अटकेत; पाच गुन्हे उघडकीस

पद्मश्री श्री. शर्मा यांच्या जलसंधारण आणि पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कार्याची आणि त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दलही श्रीमती रहाटकर यांनी कौतुकोद्गार काढले. शर्मा हे आधुनिक भगीरथ असल्याचे त्या म्हणाल्या. पद्मश्री शर्मा म्हणाले, झाबुआ येथील भिल्ल समाजासाठी केलेल्या कामाचा हा सन्मान आहे. पाणी बचतीचे महत्व स्थानिक गावकऱ्यांना सांगून जलसंधारण चळवळ सुरू झाली. त्याला स्थानिकांचा पाठिंबा मिळाल्यानेच हे काम मी करू शकलो. त्यामुळे मी केवळ माध्यम असून हा सन्मान त्यांचा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

नदीचा प्रवाह कायम वाहता राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्राचीन काळी पाण्याची विपुलता असूनही ऋषीमुनींनी पाण्याचे महत्व सांगितले, असे शर्मा यांनी नमूद केले. श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष गायधनी यांनी प्रास्ताविक केले.

श्री काळाराम मंदिराचे दर्शन:

तत्पूर्वी राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे महामंडलेश्वर महंत सुधीरदास पुजारी, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होते. श्री. पुजारी यांनी मंदिराची माहिती देत राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांचे स्वागत केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790