नाशिक (प्रतिनिधी): राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन शुक्रवारी (दि. ७) नाशिक दौऱ्यावर येणार असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदावरी जन्मोत्सवांतर्गत गोदावरीची महाआरती केली जाणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते पद्मश्री महेश शर्मा यांना राष्ट्रजीवन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होईल. त्यानंतर ६.३० वाजता महाआरतीला सुरुवात होणार आहे. रामकुंड परिसरातील दोनमुखी हनुमानाजवळ हा कार्यक्रम होणार आहे.
श्री रामतीर्थ सेवा समितीच्या वतीने १ फेब्रुवारीपासून गोदा जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. शुक्रवारी तिथीनुसार गोदावरी जन्मोत्सव साजरा केला जात आहे. समितीतर्फे गेल्या वर्षी १९ फेब्रुवारीला गोदा आरतीला सुरुवात झाली होती. मात्र, यंदा तिथीनुसार गोदा जन्मोत्सव ७ फेब्रुवारीलाच साजरा केला जात आहे.
१ फेब्रुवारीला सुरू झालेल्या गोदावरी जन्मोत्सव सोहळ्यांतर्गत गोदावरी पर्यावरण परिषद, निबंध स्पर्धा आणि बक्षीस वितरण, १५१ ब्रम्हवृंदांचे वेद पारायण, गोदा स्वच्छता, नाशिकच्या कन्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा विजया रहाटकर यांचा नागरी सत्कार असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. य सप्ताहाचा समारोप शुक्रवारच्या महाआरतीने होणार आहे. या गोदावरी महाआरतीला नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष शांताराम भानोसे, उपाध्यक्ष नृसिंहकृपा दास, सचिव मुकुंद खोचे, कोषाध्यक्ष आमिषा केला आदींनी केले आहे.