नाशिक। दि. ६ नोव्हेंबर २०२५: शहरातील महत्त्वाच्या गोविंदनगर रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण आहे. पायी चालणार्या नागरिकांना हा रस्ता ओलांडणे अशक्य होते. अनेकदा अपघातही होतात. नागरिकांच्या सुरक्षितेतसाठी या रस्त्यावर स्काय वॉक उभारावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका प्रशासकांना याबाबतचे निवेदन गुरुवारी, ६ नोव्हेंबर रोजी देण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक २४ झपाट्याने विकसित होत आहे. मोठ्या प्रमाणात बहुमजली इमारती उभ्या राहत आहेत. नाशिकरोड, त्र्यंबकेश्वर रोड, अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीसह शहराच्या विविध भागात जाण्या-येण्यासाठी गोविंदनगर रस्त्याचा हजारो नागरिक वापर करतात. येथे सतत वाहतूक कोंडी होते. जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी सकाळ-सायंकाळ पायी चालणार्यांची संख्या मोठी आहे.
शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना रस्ता ओलांडणे अवघड होते. अनेकदा अपघात होऊन पादचारी जखमी होतात. सिंहस्थ कुंभमेळ्यात हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. निधी नसल्याचे कारण सांगून येथे उड्डाणपूल मंजूर करणे टाळले जात आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी तिडके चौक, आर डी सर्कल, गोविंदनगर येथील गणपती मंदिराकडे जाणारा चौक यासह आवश्यक त्या ठिकाणी स्काय वॉकची उभारणी करावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, रवींद्र सोनजे, विनोद पोळ, प्रभाकर खैरनार, डॉ. संजय महाजन, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, विठ्ठलराव देवरे, डॉ. शशिकांत मोरे, डॉ. राजाराम चोपडे, मनोज वाणी, अशोक पाटील, अनंत संगमनेरकर, सतीश मणिआर, भारती चौधरी, ज्योत्स्ना पाटील, रेखा भालेराव, प्रतिभा वडगे, प्रतिभा देशमुख, दीपक दुट्टे, हरिष काळे, शैलेश महाजन आदींसह रहिवाशांनी केली आहे.
![]()

