नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अति महत्वाच्या व्यक्तींचे दौरे नाशिक शहरात सुरु आहेत. त्यामुळे या पार्श्ववभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. त्याचप्रमाणे, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने शहर आयुक्तालय हद्दीत ‘नो फ्लाईंग झोन’ आदेश लागू केले असून, बुधवारपासून (ता. ६) शुक्रवारी (ता. ८) मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही स्वरुपाच्या उड्डाणाला परवानगी नसल्याची अधिसूचना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक जारी केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालय अलर्ट मोडवर आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मंगळवारी (ता. ५) तपोवनात होणार्या सभास्थळाची पाहणी करीत सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे, आयुक्तांनी शहर हद्दीमध्ये आगामी तीन दिवस (ता. ६ ते ८) शहर परिसरामध्ये ‘नो फ्लाईंग झोन’चे आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉट एअर बलुन्स, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट या हवाई साधनांना आयुक्तालय हद्दीत वापर वा उड्डाण करण्यास मनाई केली आहे. तसेच, शहरात ड्रोनद्वारे केले जाणारे छायाचित्रिकरणाचे सर्व अधिकार पोलिस आयुक्तालयाने राखून ठेवले असून ड्रोन चालक-मालकांनी याची दक्षता घ्यावी. सदरील आदेशाचे उल्लंघन करणार्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना देण्यात आले आहे.