नाशिक | दि. ६ सप्टेंबर २०२५ : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) सकाळी ११ वाजता भद्रकाली येथील वाकडी बारव परिसरातून मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला विधिवत प्रारंभ झाला. लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवर्षावात ही मिरवणूक उत्साहात निघाली असून शहरात सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
या पारंपरिक मिरवणुकीसाठी पोलिसांनी व्यापक बंदोबस्त उभारला असून सुमारे तीन हजारांहून पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. मध्यरात्री दीड वाजेपर्यंत हा कडेकोट बंदोबस्त कायम राहणार आहे.
पोलीस उपायुक्त ४, सहाय्यक आयुक्त ६, पोलीस निरीक्षक ४७, तसेच उपनिरीक्षक, अंमलदार, महिला पोलीस, होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल, बॉम्ब शोधक व नाशक पथक अशा सर्व पथकांचा समावेश या सुरक्षा योजनेत आहे. नियंत्रण कक्षातून प्रत्येक तासाला मूर्तिदान आणि परिस्थितीबाबत अपडेट घेतले जात आहेत.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत संभाव्य राजकीय शक्तिप्रदर्शन लक्षात घेता पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. शहरातील प्रमुख मार्ग, उपनगरातील मिरवणुका तसेच विसर्जन स्थळांवर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
मुख्य विसर्जन मिरवणूक मार्ग:
वाकडी बारव (भद्रकाली) येथून सुरुवात झालेली मिरवणूक महात्मा फुले मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नर, संत गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा मार्गे मालेगाव स्टँडकडे जाऊन अखेरीस गोदाकाठी पोहोचणार आहे.
![]()

