नाशिक: कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी वेळीच करून घ्या तपासणी- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत बदल झाला आहे. अशा परिस्थितीत शरीरात काही अनैसर्गिक बदल आढळून आल्यास नागरिकांनी वेळीच आरोग्य तपासणी करून घेतल्यास कर्करोग सारख्या आजारांना वेळीच प्रतिबंध घालता येऊ शकेल, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी येथे केले.

जागतिक कर्क रोग दिवस म्हणून ४ फेब्रुवारी हा दिवस पाळला जातो. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा जिल्हास्तरीय उ‌द्घाटन सोहळा आज जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, अधिसेविका शुभांगी वाघ, डॉ. शिल्पा बांगर (जिल्हा सल्लागार तंबाखू नियंत्रण कार्यक्रम), डॉ. अमित चिंचखेडे (जिल्हा कार्यक्रम समन्वयक, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम), डॉ. राहुल हडपे (जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक) उपस्थित होते.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं: गंगापूर रोडला विवाहितेचा खून; पतीला अटक !

यावेळी कर्करोग क्षेत्रात काम करणारे डॉ. श्रीकांत खरे, डॉ. शैलेश बोंदार्डे, डॉ. शंतनु पवार, कर्करोग चिकित्सक, संदर्भ सेवा रुग्णालय, नाशिक यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच कर्करोग जनजागृतीसाठी शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनीसाठी पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

हे ही वाचा:  महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करावा - कृषीमंत्री ॲड. कोकाटे

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे म्हणाले की, बदललेली जीवनशैली, भौतिक सुविधांचा अतिरेक, व्यसनाधिनता आणि वाढते ताणतणाव यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी नियमित व्यायाम आणि वेळेवर आरोग्य तपासणी करून घेणे महत्वाचे आहे.

कर्करोगाच्या अनुषंगाने तपासणी करुन कर्करोग लक्षण सदृश्य रुग्णांचा शोध घेत त्यांना आवश्यकतेनुसार निदान व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत कर्करोग वाहन (कॅन्सर व्हॅन) जिल्ह्याला उपलब्ध झाली आहे.  स्त्रीरोग व दंतरोग तज्ञ यांना वाहनाच्या उपयुक्ततेतून तपासणीची जबाबदारी देण्यात आली आहे. गावोगावी जावुन लोकांची तपासणी करून प्रामुख्याने मौखिक, महिलांमधील स्तन व गर्भाशयाच्या कर्करोग यांचा शोध घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा:  महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटींची तरतूद

कर्करोग सदृश्य लक्षणे अथवा बाधित रुग्णांना योग्य निदान आणि आवश्यकतेनुसार उपचार व संदर्भित सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.  या वर्षाच्या कर्करोग दिनाच्या घोषवाक्यानुसार म्हणजे ‘एकत्र येऊ या व कर्करोगाला हरवू या’, या घोषवाक्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रमध्ये मोहीम राबविली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790