नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महापालिकेच्या वतीने शहरात प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविली जात असून, वर्षभरात अर्थात २०२४ मध्ये प्लास्टिक वापराविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईत एकूण २९ लाख ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तर एकूण ५८२ संस्था आणि व्यक्तींवर कारवाई करण्यात आली.
शासनाने प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतरही काही ठिकाणी नियमांकडे दुर्लक्ष करीत त्याचा नियमबाह्य वापर होत असल्याचे उघड झाले होते. प्रतिबंधित प्लास्टिकच्या मोहिमेत महापालिकेच्या पथकांनी अनेक व्यापारी, दुकानदार आणि विक्रेत्यांवर कारवाई करून दंड वसूल केला.
शहरातील बाजारपेठा, शाळा, हॉटेल्स आणि विक्री केंद्रे येथे छापे टाकून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले तर त्यांना दंड करण्यात आला. नियमांचा भंग करणाऱ्यांवर प्रति ५०० रुपयांपासून ते २५ हजार रुपये दंड आकारण्यात येतो.
प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर टाळावा. नियम मोडणाऱ्यांवर मनपाच्या वतीने कारवाई सुरूच राहणार आहे. नाशिककरांनी या मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देत पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे. – डॉ.आवेश पलोड, संचालक, मनपा घनकचरा विभाग