नाशिक (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील कळंबोली येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने म्हसरूळ परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून सुमारे पावणेतीन लाखांची वीजचोरी उघडकीस आणली असून, दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
वीजचोरीची पहिली कारवाई दिंडोरी रोड येथे करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील कळंबोली येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात नाशिक शहरात काही ठिकाणी वीजचोरी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कळंबोलीच्या भरारी पथकाने म्हसरूळ परिसरात वीजचोरी पकडण्यासाठी दोन ठिकाणी छापे टाकले. त्यात पहिल्या छाप्यात आरोपी अंबादास पांडुरंग पवार (रा. दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक) यांनी दि. १२ जून २०२३ ते २१ मे २०२४ या कालावधीत महावितरण कंपनीची २ हजार २३१ युनिटची वीजचोरी करून महावितरण कंपनीचे ४४ हजार ९०० रुपयांचे नुकसान केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी आरोपी अंबादास पवार यांच्याविरुद्ध कारवाई करून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत आरोपी मुकेश जगदीश राजपूत (रा. पोकार व्हिला, दिंडोरी रोड, पंचवटी) यांच्या घरी भरारी पथकाने छापा टाकला. त्यावेळी राजपूत यांनी दि. २१ जुलै २०२३ ते २१ मे २०२४ या कालावधीत महावितरण कंपनीची एकूण १२०८३ युनिटची वीजचोरी करून सुमारे २ लाख १५ हजार ४४८ रुपयांचे महावितरण कंपनीचे नुकसान केल्याचे उघडकीस आले. वीजचोरीप्रकरणी राजपूत यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही वीजचोऱ्यांप्रकरणी कळंबोली येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांनी प्रथम भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध फिर्याद दिली; मात्र हा गुन्हा म्हसरूळ परिसरात उघडकीस आला, म्हणून दोन्ही गुन्हे म्हसरूळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.