नाशिक। दि. २८ ऑक्टोबर २०२५: नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी शहरातील नाशिकरोड, पंचवटी आणि सिडको परिसरात मोठी मोहीम राबवून वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविली. या मोहिमेत नाशिकरोड विभागात ५०, पंचवटीत २० तर सिडको परिसरात २५ ठिकाणी कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान बिटको चौक, मुक्तिधाम, वास्को चौक, सोमाणी उद्यान आणि रेझिमेंटल प्लाझा परिसरातील पदपथावरील टपऱ्या, हातगाड्या, जाहिरात फलक, बॅनर्स आणि अनधिकृत बोर्ड जप्त करण्यात आले. महावितरणच्या खांबांवर लावलेले डिजिटल फलक व जाहिरातीसाठी वापरलेले बोर्डदेखील काढण्यात आले.
अतिक्रमण विरोधी पथक कारवाईला सुरुवात करताच परिसरातील काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्तिधाम मंदिर, रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात वाढत्या गर्दीमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याने ही मोहीम राबविण्यात आली आहे.
महापालिकेच्या विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांनी सांगितले की, “नाशिकरोड परिसरात अतिक्रमणाविरुद्ध सतत मोहीम सुरू राहील. अतिक्रमणधारकांनी स्वखुशीने अतिक्रमण हटवावे. रस्त्यावरील टेबल, खुर्च्या, बोर्ड किंवा हातगाड्या यांमुळे नागरिकांना होत असलेली गैरसोय सहन केली जाणार नाही.”
दरम्यान, देवळालीगाव परिसरातील सोमवारच्या आठवडे बाजारातही अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. सुरुवातीला विक्रेत्यांनी दुकाने न थाटता थांबले; मात्र पथक निघून गेल्यानंतर काही वेळातच रस्त्याच्या कडेला पुन्हा भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने लावल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला.
महापालिकेने शहरातील प्रमुख भागांतील पदपथ आणि रस्त्यांवरील अनधिकृत अतिक्रमणाविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, आगामी दिवसांत ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा मनपा प्रशासनाचा निर्धार आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790