नाशिक: उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष- जलज शर्मा

नाशिक। दि. २६ सप्टेंबर २०२५: जिल्ह्यात अधिकाधिक औद्योगिक गुंतवणूक यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण असावे, यासाठी उद्योजकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निमा हाऊस येथे झाली, यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, महावितरणचे उपमुख्य महाव्यवस्थापक सुंदर लटपटे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. चकोर आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी यावेळी मागील बैठकीत झालेल्या विषयांच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. तसेच, याबाबत उद्योजकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील, यास प्रशासनाचे प्राधान्य असेल. उद्योगांसाठी असलेल्या विविध परवानग्या मिळण्यासाठी जाणारा वेळ कमी व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

⚡ हे ही वाचा:  राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता; नाशिकला यलो अलर्ट

येथील उद्योगांचे राज्यस्तरावर काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्याअनुषंगाने उद्योजकांच्या विविध संघटना सातत्याने प्रयत्न करीत असतात. जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही हे प्रश्न मार्गी लागतील, यासाठी निश्चितपणे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. जिल्हा नियोजन निधीमधून ज्याप्रमाणे काही क्षेत्रांसाठी ठराविक निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे, तसा निधी ठेवला जावा, यासाठी राज्य स्तरावर पाठपुरावा केला जाईल.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहर आणि जिल्ह्यात विविध यंत्रणांच्या वतीने विकासकामे करण्यात येत आहेत. औद्योगिक संघटनांनी संबंधित प्राधिकरणांशी समन्वय साधून उद्योगांशी निगडीत विषय मार्गी लावण्याची सूचनाही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, एमआयडीसी क्षेत्रातील वीजपुरवठ्याबाबतच्या विविध प्रश्नांबाबत तातडीने कार्यवाही करणे, वाढत्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीकोनातून नाशिकसाठी स्वतंत्र वीजपुरवठा स्टेशन उभारणेबाबतची कार्यवाही करणे आदींबाबत त्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचे प्रश्न राज्य स्तरावर प्रलंबित असतील तर त्याचा पाठपुरावा करुन ते तातडीने मार्गी लागतील, हे पाहावे. त्यासाठी उद्योगांच्या संघटना आणि प्रतिनिधींसोबत समन्वय ठेवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांनी दिल्या.

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी एमआयडीसी किंवा औद्योगिक सहकारी वसाहत नाही, तेथे रस्ते, पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आदी मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत निश्चितपणे कार्यवाही केली जाईल. उद्योग संघटनांनी याबाबत, जिल्ह्यातील याबाबतचा तपशील उपलब्ध करुन द्यावा, असे त्यांनी सांगितले. याबाबत एमआयडीसी, जिल्हा परिषद, मनपा यांची एकत्रित बैठक घेऊन आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित उद्योजकांनी विविध समस्या मांडल्या. त्याचेही निराकरण जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनीही आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सीसीटीव्हि कार्यरत असेल, याची खात्री करण्याची सूचना केली. पोलीस विभागाच्या वतीने पाहणी करुन ज्याठिकाणी ब्लॅक स्पॉट असतील, तेथे सीसीटीव्ही बसविण्यात येतील. याशिवाय, उद्योगांमध्ये काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचारी यांचा डेटाबेस तयार केला जात असून पोलीस दलातील गस्ती कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी समन्वय साधून दिला जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील सुरक्षा नियोजन अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here