नाशिक। दि. २३ सप्टेंबर २०२५: भगूर येथील ग्रामदेवता रेणुकामातेच्या यात्रोत्सवानिमित्त शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. रेस्ट कॅम्प रोडसह केंद्रीय विद्यालय ते जोशी हॉटेलपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी संपूर्णतः दहा दिवस दुपारी एक ते रात्री बारा वाजेपर्यंत बंद करण्यात येत आहे. या बाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सैन्याच्या वाहनांना निर्बंध लागू नाही:
या अधिसूचनेनुसार सैन्यदलाच्या सेवेतील कुठल्याही वाहनांना वरील निर्बंध लागू राहणार नाही. या दहा दिवसांच्या कालावधीत सैन्यदलाची वाहने त्यांच्या नेहमीच्या वापरातील रस्त्यांवरून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करत ये-जा करतील. तसेच पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब, शववाहिका तसेच स्थानिक निवासी नागरिकांच्या वाहनांना निर्बंध लागू राहणार नाही, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
पर्यायी मार्ग असा:
भगूरकडून देवळाली कॅम्पकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक रेस्ट कॅम्परोडवरील जोशी रुग्णालयाकडून स्नेहनगर-पेरूमल मार्ग-खंडोबा टेकडी रस्त्याने जोझिला मार्ग येथून सेंट्रल कॅम्प स्कूलमार्गे जातील.
देवळाली कॅम्पकडून- भगूरकडे जाणारी वाहतूक भगूर नाका क्र. २ येथून डावीकडे वळण घेत मल्हारी बाबानगरमार्गे बार्ल्स स्कूल रोडवरून शिंगवे बहुला-धोंडीरोड-खंडोबा टेकडी-डेअरी फार्म-आनंदरोडने संसरी नाक्याकडे रवाना होईल.
भगूरकडे जाणारी जड-अवजड वाहने ही संसरी नाका येथून उजवीकडे वळण घेत आनंदरोडवरून पुढे शिंगवे बहुलामार्गे बार्न्स स्कूलरोडने भगूर नाका क्र. रकडे रवाना होतील.
![]()

