
नाशिक। दि. २१ जून २०२५: शारिरीक व मानसिकरित्या सुदृढ व सशक्त होण्यासाठी प्रत्येकाने नियतिम योगासने आणि प्राणायाम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प, यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, श्री चैतन्य टेक्नो स्कुल व भारतीय योग संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री चैतन्य टेक्नो स्कुल येथे आंतरराष्ट्रीय योग महोत्सव साजरा करण्यात आला.
या योग महोत्सवाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेपटनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत योग विद्याधामचे संस्थापक डॉ. विश्वास मंडलिक, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, श्री चैतन्य टेक्नो स्कुलच्या प्राचार्या श्रीमती प्रतिक्षा सिंह, श्री चैतन्य टेक्नो स्कुलचे व्यवस्थापक श्री. विनायक राजगुरु भारतीय योग संस्थानचे श्री. दिलीप जाजू आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)यांनी सांगितले की, योगा फोर वन अर्थ, वन हेल्थ्य ही यावर्षाच्या योग दिनाची थीम आहे. त्यानुसार घरोघरी योग पोहचावा यासाठी विद्यापीठाकडून योग महोत्सव राबविण्यात आला. या सप्ताहात सुमारे पाच हजार पेक्षा जास्त लोकांपर्यंत योग पोहचविण्यात आला. शारिरीक व मानसिक स्वास्थ्य संतुलित राखण्यासाठी सर्वांनी योग अभ्यास करणे गरजेचे आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, धावत्या जीवनशैलीमुळे जीवनात योग शिक्षणाची गरज वाढली आहे. शाळा, महाविद्यालयांतील शिक्षणाप्रमाणेच सामुदायिक योग शिक्षणाची पध्दत रुढ होत आहे. आज जगभर योगशिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यापीठे, योगशिक्षक याव्दारा योगशिबीरे इत्यादींच्या माध्यमांतून योगाचे धडे दिले जात आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेला हा योग महोत्सव उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी योग विद्याधामचे संस्थापक डॉ. विश्वास मंडलिक यांनी सांगितले की, योग ही साधना आहे. मानसिक स्वास्थ्याकरीता प्रत्येकाने योगाभ्यास करावा. मा. पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेले आंतराष्ट्रीय योग दिवस खऱ्या अर्थाने यशस्वी झल्याचे वाटते. ’वसुदेव कुटुंबकम् ’ या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. योग साधना केल्याने आत्मीयीता वाढते. भाषा, देश, संस्कृती वेगवेगळी असली तरी योगअभ्यास करतांना निर्माण झलेले बंध अतूट असतात. माणसाला माणूस म्हणून जोडण्याची शक्ती यात आहे. योग अभ्यासाच्या निमित्ताने सर्व लोक सुखी आणि समाधानी झल्यास भूतलावर स्वर्गच अवतरेल असे त्यांनी सांगितली.
यावेळी श्री चैतन्य टेक्नो स्कुलच्या प्राचार्या श्रीमती प्रतिक्षा सिंह यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री चैतन्य टेक्नो स्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थनेने नमन केले तद् नंतर प्रातिनिधी स्वरुपात विद्यार्थ्यांनी आसने केली. या योगअभ्यास वर्गात भारतीय योग संस्थानचे योग शिक्षक बलवीर सिंग वाजवा यांच्या मार्गदर्शनाखाली दंडस्थितीतील आसने, बैठकस्थितीतील आसने, शयनस्थितीतील आसने व प्राणायाम आदी योगप्रकारातील क्रिया करण्यात आल्या. या योग महोत्सवात तीन सत्रात सुमारे १५०० पेक्षा अधिक योग साधकांनी सहभाग घेतला आहे.
योगवर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात सूत्रसंचालन श्री चैतन्य टेक्नो स्कुलच्या श्री. विनायक राजगुरु व विद्यापीठाच्या आयुष विभागाच्या प्रमुख डॉ. गितांजली कार्ले यांनी केले. या योग वर्गाकरीता विद्यापीठाचे अधिकारी डॉ. स्वाती जाधव, डॉ. अनुश्री नेटके, डॉ. स्वप्नील तोरणे तसेच श्री चैतन्य टेक्नो स्कुलचे विद्यार्थी, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
![]()

