नाशिक। दि. २१ जून २०२५: विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये नवीन व्हॉल्व्ह बसविण्यासह इतर कामे करण्यात येणार असल्यामुळे शहरात शनिवारी (दि. २१) सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी ही (दि. २२) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेच्या ठिकठिकाणचे जलशुद्धीकरण केंद्र व बुस्टर पंपिंग स्टेशन येथे विविध विकास कामे सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन व्हॉल्व्ह व फ्लोमीटर्स बसविणे, तसेच जलवाहिन्यांच्या कामांसाठी शटडाऊनची मागणी केली आहे. त्यामुळे सदर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शनिवार दि. २१ जून शटडाऊन घेण्यात येत आहे. त्यामुळे शनिवारचा शहरास पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही. तसेच रविवारी (दि. २२) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावे, असे आवाहन मनपाने केले आहे.