नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): सावरकरनगरमधील गोदावरी लगत असलेल्या आसाराम बापू आश्रमात नागरिकांना बिबट्या दिसल्याने परिसरात भीती पसरली आहे. येथे मच्छरदाणीमध्ये झोपलेल्या व्यक्तीने बिबट्याला बघितले. त्याने जोरजोरात आवाज केल्याने बिबट्या पळून गेल्याचे सांगण्यात येते. या घटनेने दिवसभर या भागात शुकशुकाट पसरला होता.
सावरकरनगरकडून चांदसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असेलेल्या पुलालगतच्या आश्रमात बिबट्या दिसला होता. गोदावरीलगत दाट झाडी असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा असते. या परिसरात नागरिकांना अनेकदा बिबट्या दिसून येतो. मंगळवारी (दि. १९) पहाटे आश्रमातील व्यक्तीला बिबट्या दिसला.
त्याने आरडा-ओरड केल्याने वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी आणि आश्रमातील इतर लोकांनीही धाव घेत मोठ्याने आवाज केल्याने बिबट्याने धूम ठेकल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात पहाणी केली मात्र बिबट्या दिसून आला नाही. नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.