नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): दीड लाखाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करून अटकेसाठी शोधात असलेल्या पुरातत्वचे संचालक तेजस मदन गर्गे याने अखेर अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या अटकपूर्व जामिनावर येत्या १७ तारखेला सुनावणी होणार आहे.
यासंदर्भात, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रामशेज किल्ल्याच्या परिसरात नवीन उद्योगासाठी पुरातत्व खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात उद्योजकाकडून १ लाख ५० हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी एसीबीने संचालक तेजस मदन गर्गे यांच्यासह सहायक संचालक आरती आळे यांच्याविरोधात दाखल गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्ह्याला आठवडा उलटूनही गर्गे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, गेल्या बुधवारी (दि. ८) रात्री एसीबीच्या पथकाने राणेनगरजवळ गर्गे यांच्या मालकीच्याच फ्लॅटमध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या सहायक संचालक आरती आळे यांना तक्रारदाराकडून १ लाख ५० हजारांची रक्कम स्वीकारताना पथकाने पकडले. त्या प्रसूती रजेवर असल्याने त्यांना नोटीस बजावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गर्गे यांच्या अटकेसाठी मुंबई, पुणे या ठिकाणी शोध सुरू केला आहे. त्याचा भाऊ श्रेयस गर्गे व कुटुंबियांचीही चौकशी होत आहे. गर्गे याने अटकपूर्व अर्ज दाखल केला असून त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. एसीबीकडून त्यांच्याकडील बेहिशेबी मालमत्ता तपासण्यासाठी अटकेची आवश्यकता असल्याचे व गुन्हा दाखल होऊनही तपासात सहकार्य न केल्याने अटकपूर्व फेटाळण्याची मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.