
नाशिक (प्रतिनिधी): केशव कथक नृत्यालयातर्फे अभंगांवर आधारित एक आगळावेगळा नृत्याविष्कार “आदी अनंत विठ्ठला” या नावाने आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दि. १६ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता नाशिक येथील कालिदास कलामंदिर येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायाची भक्तिपरंपरा कथक नृत्यशैलीतून रसिकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रेक्षकांना संगीत, नृत्य आणि भक्तिरसाची त्रिवेणी पाहायला मिळणार असून, गायक हर्षद गोळेसर (कलर्स टी.व्ही. ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम) आणि गायिका दुहिता कुणकवळेकर (संगीत सम्राट फेम) यांचा सहभाग आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कथक गुरु डॉ. सुमुखी अथनी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
केशव कथक नृत्यालय ही संस्था गेल्या १२ वर्षांपासून नाशिक आणि पिंपळगाव (ब).येथे कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक रोहित जंजाळे हे कथक नृत्याचे प्रसिद्ध कलाकार असून, त्यांनी विविध विषयांवर आधारित नृत्यसंरचना सादर केल्या आहेत. “आदी अनंत विठ्ठला” ही त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेली एक भक्तिरसपूर्ण निर्मिती आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, नाशिककर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिपूर्ण नृत्याविष्काराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.