
नाशिक। दि. ७ नोव्हेंबर २०२५: बंकिमचंद्र चटोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम्’ या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला स्फुलिंग मिळाले. या गीताने भारतीय एकत्र झाले. त्यांना प्रेरणा मिळाल्याने भारतीय नागरिक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.

बंकिमचंद्र चटोपाध्याय लिखित ‘वंदे मातरम्’ या गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यातर्फे आज सकाळी महात्मा नगर मैदानावर ‘वंदे मातरम्’ या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक आर. एस. मुंडासे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी इंद्रभान काकड, तहसीलदार अमोल निकम, व्याख्याते डॉ. सुनील अमृतकर आदी उपस्थित होते. यावेळी सुवर्णा क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘वंदे मातरम्’ हे गीत सादर केले, तर संस्कार भारतीच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर लघु नाटिका सादर केली.
आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ या गीताला फार मोठा इतिहास आहे. हे गीत म्हणजे भारत मातेला वंदन करणारे गीत आहे. सुजलाम् – सुफलाम् भारत देशाला परकियांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी हे गीत देशभक्तीच्या भावनेतून तयार झाले आहे. हे गीत भारतीय स्वातंत्र्यानंतरही तेवढ्याच क्षमतेने भारतीयांना प्रेरणा देत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे यांच्यासारख्या स्वातंत्र्य वीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या या भूमीत ‘वंदे मातरम्’ या गीताचे चारही कडव्यांचे गायन करण्यात आले ही आनंदाची बाब आहे. संगीताच्या विविध चाली या गीताला लाभल्या आहेत. त्याचा अभ्यास तरुणांनी करावा. तसेच या गीताच्या अनुषांगाने निर्मित विविध साहित्याचे वाचन करीत देशाला बळकट करावे, असेही आवाहन विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी केले.
प्रमुख व्याख्याते डॉ. सुनील अमृतकर यांनी सांगितले की, देश पारतंत्र्यात असताना ‘वंदे मातरम्’ या गीताने नागरिकांमध्ये जनजागृती केली. बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेले हे गीत ‘आनंदमठ’ या कादंबरीत या गीताचा समावेश केला. या गीताने स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमामुळे नागरिकांना या गीताची माहिती मिळाली आहे. जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी श्री. काकड यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य दीपक बाविस्कर यांनी आभार मानले.
आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त दिनकर पावरा, प्राचार्य दीपक बाविस्कर, मनीषा बोरुडे, संस्कार भारतीचे श्री. क्षीरे आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()

