नाशिक। दि. ३ सप्टेंबर २०२५: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महापालिका क्षेत्रात हाती घेण्यात येणारी कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असावीत तसेच विहित मुदतीत ही कामे पूर्ण होतील याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या.
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महापालिका करत असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गेडाम यांनी महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्प आणि मल शुद्धीकरण प्रकल्पांचा आढावा घेतला. विल्होळी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील कामाबाबत त्यांनी माहिती घेतली जलशुद्धीकरण आणि मल शुद्धीकरण प्रकल्पांचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी शहरातील रामकाल पथ कामाबाबतही त्यांनी माहिती घेतली. हे काम २०२६ अखेर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. सिंहस्थ कुंभमेळा साठी हाती घेतलेले प्रत्येक काम हे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असेल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक कामाचे गुणवत्ता नियंत्रण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महापालिका आयुक्त श्रीमती खत्री तसेच इतर विभाग प्रमुखांनी महापालिका करत असलेल्या कामांबाबतची सद्यःस्थिती स्पष्ट केली.
![]()

