Breaking

नाशिक: अवकाळी पावसाने शहर जलमय; सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय

नाशिक। दि. ३ एप्रिल २०२६: नाशिक शहर व परिसरात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने उकाड्याची तीव्रता वाढली होती. दुपारपासूनच हवामान दमट झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते. सायंकाळी सुमारे साडेपाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांतच पावसाने जोर धरत सुमारे ४५ मिनिटे मुसळधार सरी कोसळल्या आणि शहरातील अनेक भाग जलमय झाले.

हवामान विभागाने यापूर्वीच जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता, तो प्रत्यक्षात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाशिक शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातही वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी आलेल्या या पावसामुळे घरी परतणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेकांनी दुचाकी रस्त्यालगत उभ्या करून आसरा घेतला, तर काहींनी उड्डाणपुलाखाली थांबणे पसंत केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील रस्त्यांच्या कामांमुळे २५ सिटीलिंक बसफेऱ्यांच्या मार्गात बदल

दरम्यान, शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे रस्त्यांची अवस्था आधीच खराब झाली असून पावसामुळे सर्वत्र चिखल पसरला. परिणामी, दुचाकीस्वारांना घसरगुंडीचा सामना करावा लागला. सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला.

वादळी वाऱ्यामुळे गणेशवाडी परिसरात एक झाड कोसळले, मात्र सुदैवाने मोठी हानी टळली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीजतारांवर पडल्याने विद्युतपुरवठा विस्कळीत झाला. अग्निशमन दल व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत फांद्या हटवण्याचे व दुरुस्तीचे काम रात्रीपर्यंत सुरू ठेवले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिटीलिंकची 'या' नवीन मार्गावर बससेवा सुरु… जाणून घ्या सविस्तर…

दहीपूल, हुंडीवाला लेन, टांकसाळ लेन, पिंपळपार, सरस्वती लेन, भद्रकाली परिसर, मेन रोड, सराफ बाजार, भांडी बाजार, दूध बाजार आणि बोहरपट्टी या भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने बाजारपेठांमध्ये चिखल व पाण्याचे डबके निर्माण झाले. व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, तर ग्राहकांनीही पावसापासून बचावासाठी आसरा शोधला. काही ठिकाणी रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे दुचाकी बंद पडण्याच्या घटना घडल्या.

🔎 हे वाचलं का?:  व्यावसायिक गॅस, प्रीमिअम पेट्रोल, विमान इंधन महागले

याआधी बुधवारी रात्रीपासूनच उकाड्याची तीव्रता वाढू लागली होती. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिल्याने नागरिक हैराण झाले होते. सकाळी किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पुढील दोन दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता असून शुक्रवारी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

३९ मिमी पाऊस:
ऑरेंज अलर्टनुसार शहरात सायंकाळी जोरदार पाऊस झाला. पावणेसहा वाजल्यापासून पुढे साधारणतः सव्वासात वाजेपर्यंत पावसाचा जोर टिकून होता. या कालावधीत एकूण ३९ मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790