
नाशिक। दि. १ जुलै २०२५: शहरातील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालक युनियनने जिल्हा रुग्णालयाबाहेर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे.
राज्यातील १०८ रुग्णवाहिका वाहन चालक गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय महत्वाची आणि तात्काळ सेवा देत आहेत. सदर चालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन शासनाकडून वेळोवेळी देण्यात आले, मात्र आश्वासनांची पूर्तता झाली नाही अशी चालक युनियनची तक्रार आहे. यामुळे युनियनमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे.
या रुग्णवाहिका चालकांना अल्प वेतनावर काम करावे लागते. त्यामुळे समान काम समान वेतन तत्वावर वेतन व भत्ते १४ ऑकटोबर २०२४ च्या अधिसूचनेनुसार कुशल दर्जाचे वेतन अदा करावे, आठ तासांपेक्षा अधिक कामाबद्दल दुप्पट दराने मोबदला देण्यात यावा, सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा व रजेचे वेतन मिळावे, कॅशलेस आरोग्य विमा मिळावा, ८.३३% वार्षिक बोनस मिळावा, वाहन धुलाई भत्ता मिळावा, १० तारखेच्या आत वेतन मिळावे, ५ वर्षांनंतर ग्रॅज्युइटी मिळावी अशा अनेक विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
शासनाने लवकरात लवकर या मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी युनियनचे अध्यक्ष नागनाथ नरळे, उपाध्यक्ष पांडुरंग ठोमके, जनरल सेक्रेटरी संदीप पष्टे तसेच रुग्णवाहिका चालक सुरेश बर्वे, राजू खैरनार, निवास घुगे व इतर सर्व रुग्णवाहिका चालकांनी केली आहे.