नाशिक(प्रतिनिधी): अंबड लिंक रोड सातपूर, नाशिक येथील 71 वर्षीय पुरुष रूग्ण जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक येथे 19 मे 2020 ला हृदयविकार व मधुमेहच्या उपचारासाठी अत्यंत चिंताजनक परिस्थितीमध्ये दाखल झाले होते, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता, ते कोरोना संसर्गित असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाने दिली आहे.
या रूग्णाला दम लागत असल्यामुळे त्यांचे घशाचे नमुने रूग्णालयामार्फत तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यांच्यावर रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत सर्व प्रकारचे उपचार करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती अत्यंत अस्वस्थ असल्यामुळे उपचारास त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्याच दिवशी (19 मे 2020) एका तासात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या घशाच्या नमुन्याचा अहवाल आज (21 मे 2020 रोजी ) जिल्हा सामान्य रूग्णालयास प्राप्त झाला असून सदर रूग्ण करोना संसर्गित होते, असे रूग्णालयाने कळविले आहे.
सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 45 रुग्ण उपचार घेत आहे. त्यापैकी करोना बाधित 15 व करोना संशयित 20 रुग्ण आहेत. त्यांच्यावर तज्ञ वैद्यकीय पथकामार्फत उपचार सुरु असून त्या सर्वांची प्रकृती सुधारत आहे, असेही डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक यांनी कळविले आहे.