नाशिक: सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन !

नाशिक (प्रतिनिधी): येत्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीज जोडण्या व तत्पर वीजसेवा देण्यासाठी नाशिक परिमंडळातील महावितरणची यंत्रणा सज्ज असून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी घरगुती दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

गणेश मंडळांना सुरक्षा ठेवीची (अनामत) रक्कम परत करण्याची कार्यवाही तातडीने करा, असे निर्देश नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सर्व विभागांना दिले आहेत. गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्याची कार्यवाही जलदगतीने झाली पाहिजे. ऑनलाइन अर्ज भरण्यासह इतर काही अडचणी येत असल्यास मंडळांना त्यासाठी सहकार्य करावे. जेथून नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे अशा सर्व रोहित्रांची व मिरवणुकांच्या मार्गावरील वीजयंत्रणेची पाहणी करावी व आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्ती करावी. तसेच गणेश मंडळांच्या सुरक्षा ठेवीची रक्कम बँक खात्यात परत करण्याची कार्यवाही गणेशोत्सवानंतर लवकर पूर्ण करावी, यामध्ये  विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी निर्देशित केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे.

मंडपातील वीज यंत्रणेची अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो. त्यातून विद्युत अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी. हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी गांभिर्याने दखल घेवून वीज सुरक्षेबाबत उपाय योजनांमध्ये तडजोड करू नये.

गणेशोत्सवात अधिकृतपणे वीजजोडणी घ्यावी काही ठिकाणी अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठया प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते. गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790