आदेशालाही जुमानले नाही आणि दंडालाही नाही, त्यामुळे आता महापालिका आणि पोलीस करताय अशी कारवाई…
जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
नाशिकरोड परिसरात देखील नाशिक महानगरपालिका आणि नाशिकरोड पोलीस ठाणे यांनी संयुक्तीकरित्या कोरोना बाबतच्या शासन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर अनोखी शक्कल लढवत कारवाई करायला सुरुवात केली आहे.
कोरोना आटोक्यात यावा यासाठी शासनाकडून दंडात्मक कार्यवाई बरोबरच “नो मास्क ,नो एन्ट्री”,”माझा परिवार माझी जबाबदारी”, “मी एक जबाबदार नागरिक” अशी अभियानं राबविली गेली, तरी देखील नागरिकांमध्ये काही सुधारणा होत नव्हती.
आता महापालिका आणि पोलीस प्रशासन मिळून मास्क न वापरणाऱ्यांची धरपकड केली जात आहे, त्यांनंतर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाई न करता थेट पोलीस गाडीत टाकून कोरोना सेंटर येथे नेऊन त्यांची कोविड चाचणी केली जात आहे. जे नागरिक कोरोना चाचणी करणार नाही त्यांना दंड आकारला जाणार आहे तर जे लोक चाचणीत पॉझिटिव्ह आढळून येईल त्यांना तात्काळ ऍडमिट करून घेण्यात येणार आहे.
नाशिकरोड परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सत्कार पॉईंट व भाजीपाला मार्केट या ठिकाणी 30 ते 40 नागरिकांना टेस्टिंगसह प्रत्येकी 200 दंड आकारण्यात आला आहे तर नागरिकांनी अजूनही सूचनांचे पालन केले नाही तर यापेक्षा अजून अनोखी आणि कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे…!