नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अ.भा. म.नाट्य परिषद, नाशिक (नाट्यसेवा) आयोजित श्यामची आई व सपान थिएटर्स प्रस्तुत कलगीतुरा नाटकांनी दुसऱ्या दिवसाची रंगत वाढविली. या दोन्ही नाटकांच्या प्रयोगास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
साने गुरूजी लिखित श्यामची आई ही एक अजरामर कलाकृती असून आपल्या आईचं उत्कट अन् प्रत्ययकारी चित्रण सानेगुरूजींनी या पुस्तकातून उभ केलेले. आईरूपी संस्काराची शिदोरी साने गुरूजींना आयुष्याच्या खडतर वाटेवरही मार्गदर्शक ठरली.
आज महासंस्कृती महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अ.भा. म.नाट्य परिषद, नाशिक (नाट्यसेवा) दिग्दर्शक आनंद जाधव यांनी श्यामची आई दोन अंकी नाटकांचे उत्कट सादरीकरण केले. या नाटकात सई मोराणकर, प्रचिती अहिरराव, विश्वंभर परेवाल, सौरभ क्षिरसागर, तनिष्का अहिरराव, केतन डोके, अशुतोष चौहान, शरण्या राजपूत, धनिष्ठा जाधव, हर्षदिप अहिरराव, समर्थ लोखंडे व आर्यन जाधव या कलाकारांनी सहभाग नोंदविला. या नाटकाचे निर्माता राजेंद्र जाधव तर नाटकास ओम देशमुख यांनी संगीत दिले होते. वरून भोईर यांचे नेपथ्य, रविंद्र जाधव यांनी रंगभूषा व कृतार्थ कंसारा यांनी प्रकाश योजना, पोस्टर डिझाईन सागर काची आणि वेषभूषा प्रचिती अहिरराव यांनी साकारली.
यानंतर दत्ता पाटील लिखित व सचिन शिंदे दिग्दर्शित कलगीतुरा या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण झाले. ‘कलगीतुरा’ ही लोककला परंपरा आहे. कलगीतुरा हा महाराष्ट्रातील विविध प्रांतांच्या बोलीभाषांमधून, लहेजातून लिहिलेल्या शाहिरी लावण्यांचा लावण्यांचा प्रकार आहे. गावागावांतून बहुजन शेतकरी बांधव कलगीतुऱ्याच्या माध्यमातून या आध्यात्मिक लावण्या सादर करीत. काही पौराणिक कथांच्या आधारे कूटप्रश्न या लावण्यांमधून एकमेकांना विचारत. त्यातून उत्तरं मिळवत.
कलगी म्हणजे शक्ती आणि तुरा म्हणजे शिव. मग शिव श्रेष्ठ की शक्ती श्रेष्ठ, असा हा आध्यात्मिक झगडा या लोकरचनांमधून सादर होत असे. गावात कुणाचं निधन झालं, तर ज्या घरात ही दु:खद घटना घडे, तिथे ही कलगीतुरा गाणारी माणसं रात्रभर आध्यात्मिक लावण्या गात त्यांच्या परिवाराची, दु:खाची राखण करीत असत. जागतिकीकरण, आधुनिकीकरण, सामाजिक अभिसरण, आर्थिक उदारीकरणानंतर लोप पावलेली ही परंपरा थांबली. परंतु सुमारे दोन दशकांनंतर गावातील मध्यम वयीन तरुणांनी जुने हस्तलिखिते वाचून रात्रीच्या अंधारात गुपचूप तालमी केल्या, अभ्यास केला, चाली शोधून काढल्या आणि ही लोप पावलेली परंपरा पुन्हा प्रवाहीत केली. परंपरेच्या, जगण्याच्या हरवलेल्या लयीच्या पुनरुत्थानाची ही संगीतमय नाट्यमय कथा म्हणजे ‘कलगीतुरा’
निर्माती राजेश्री शिंदे यांची ही नाट्यमय कलाकृती हेमंत महाजन, विक्रम नन्नावरे, निलेश सुर्यवंशी, राम वाणी, अरुण इंगळे, ऋषिकेश शेलार, राजेंद्र उगले, कृष्णा शिरसाठ, प्रवीण जाधव, शुभम लांडगे, किरण रावबच्चे, श्रुती कापसे, कविता देसाई, ऋषिकेश पाटील या कालाकारांनी सादर केली. नाटकास ऋषिकेश शेलार यांचे संगीत, रोहित सरोदे यांचे संगीत संयोजन, प्रणव सपकाळे यांची प्रकाशयोजना, चेतन बर्वे, लक्ष्मण कोकणे यांचे नेपथ्य, ललित कुलकर्णी यांची रंगभूषा तर वेशभूषा कविता देसाई यांची होती.
महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शुक्रवार, दि. १ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत नाशिक जिल्हा असोसिएशनच्या वतीने लता मंगेशकर यांना आदरांजली हा मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. यानंतर ५ ते ६ या वेळेत मालेगावचे ह. भ. प. श्रावण अहिरे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत मैदानी खेळ व दांडपट्टा लाठीकाठी रिंग व लेझिमचे सादरीकरण रुंगाठा हायस्कूलचे पथक करणार आहे. त्यानंतर 7 ते 10 वाजता मराठी नाटक कुरर्र चे सादरीकरण कलाकर विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, प्रियदर्शन जाधव व सहकलाकर करणार आहेत. महोत्सवासाठी प्रवेश नि:शुल्क असून नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.