नाशिक (प्रतिनिधी): कोरोनामुळे जिल्ह्यात १२ मेपासून केलेला कडक लॉकडाऊन आजपासून शिथिल करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने उद्योगधंदे, कारखाने आणि बाजार समित्यांना अटीशर्तींसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर किराणा तसेच भाजीविक्री दुकाने ही आता सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान सुरू ठेवता येतील. इतर बाबींसाठी राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध हे १ जूनला सकाळी ७ पर्यंत कायम असल्याने त्यानुसार मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्ससह बाजारपेठा मात्र बंद असतील.
या बाबी राहणार सुरू:
उद्योग, कारखाने आणि बाजार समित्या अटीशर्तींवर, किराणा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान.
यावर असेल बंदी:
मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, बाजारपेठा, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, मैदाने, क्रीडांगणे, तरणतलाव, परजिल्ह्यात प्रवासावर सशर्त बंदी, शहरात अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास करता येणार नाही.
इतर बाबींसाठी राज्य शासनाचे निर्बंध १ जून सकाळी ७ पर्यंत कायम:
लग्नसोहळ्यांवर पूर्णपणे बंदी, रजिस्टर विवाहास ५ व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी., अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींना मुभा., दूध विक्री सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ५ ते ७., हॉटेलमधून केवळ पार्सल सुविधा., आजारपणासाठी प्रवासाची मुभा, भाजीविक्री दुकाने सकाळी ७ ते ११ दरम्यान, रस्त्यावरील विक्रेत्यांना विकेंद्रीकरण पद्धतीने भाजी विक्रीस परवानगी.
नियम, अटींचे पालन करावे, अन्यथा कारवाई:
सध्या फक्त उद्योग आणि बाजार समित्या सुरू करण्यास परवानगी आहे. त्याशिवाय १२ तारखेपूर्वीच्या बंद असलेल्या बाकी बाबी बंदच असतील. उद्योग सुरू करताना कामगार सुरक्षा तसेच त्यांच्या कोरोना चाचण्यांसह इतर अटी उद्योजकांवर बंधनकारक असतील. हा अहवाल एमआयडीसीला पाठवावा लागेल. बाजार समित्यांनीही कोरोना नियम, अटींचे पालन करावे, अन्यथा आस्थापनांवर कारवाई केली जाईल. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी