नाशिक: फर्निचर गोदामाला भीषण आग; कामगारांना वेळीच जाग आल्याने जीवित हानी टळली !
नाशिक (प्रतिनिधी): येथील वडनेर दूमाला रोडवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास एमके फर्निचर मॉल आणि गोदामाला अचानक आग लागली. बघता बघता आगीने प्रचंड रौद्ररुप धारण केले…
शहराजवळील वडनेर-पाथर्डी रस्त्यावरील एका फर्निचर मॉलसह त्या शेजारी असलेल्या भंगार मालाच्या गोदामाला आज पहाटे भीषण आग लागली.
यावेळी मॉलमध्ये झोपलेले आठ ते दहा कामगार सुदैवाने वेळीच जागे झाल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या आगीमध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे.
लाकडी साहित्य असल्यामुळे आगीचा भडका उडाला. फर्निचर मॉल आणि गोदाम आगीच्या भक्षस्थानी सापडले. आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली की, दुकानाच्या बाजूला असलेल्या चार ते पाच घरांना हानी पोहोचली. काही वाहनेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
दरम्यान आज (दि. ३ नोव्हेंबर २०२२) पहाटे तीन वाजेच्या सुमारास या गोडाऊनच्या काही भागातून धुराचा वास शेजाच्या रहिवाशांना येऊ लागला. काही नागरिकांनी बाहेर येऊन पहिले असता तर फर्निचर गोदामाला आग लागल्याचे निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ 100 नंबर वर अग्निशामन मुख्यालयाला ही माहिती कळवली. दरम्यान नाशिक रोड अग्निशामन केंद्राला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी सुरुवात केली. मात्र आगेची भीषणता लक्षात घेऊन नाशिक शहरातील पंचवटी, के के वाघ, नाशिक शहर मुख्यालय, सिडको, सातपूर या अग्निशामन मुख्यालयाहून सात बंब घटनास्थळी दाखल झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.