नाशिक (प्रतिनिधी): एका खासगी कंपनीत सुपरवायझर पदावर असलेल्या व्यक्तीने कंपनीच्या मालाच्या विक्रीतून आलेली १५ लाख ६१ हजार रूपयांची रक्कम बँक खात्यात जमा न करता परस्पर अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात संशयित नीलेश दिलीप कुमावत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत सुपरवायझर पदावर असताना कुमावत याने मालाची विक्री करून त्यातून जमा झालेली रक्कम कंपनीच्या अधिकृत असलेल्या बँकेच्या खात्यात जमा न करता स्वतःजवळ ठेवून अपहार केल्याचे संदीप केदारनाथ सालपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सालपुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नीलेश कुमावत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत संशयित कुमावत महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीत सुपरवायझर पदावर काम करत होता. त्यावेळी त्याने कंपनी मालाची विक्री करून त्यातून जमा झालेली १५ लाख ६१ हजार ५४२ रुपयांची रक्कम बँकेच्या कर्मचाऱ्याकडे जमा न करता स्वतः जवळ ठेवून अपहार केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ८३/२०२४)