नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जपान, न्यूझीलंड या देशांमध्ये सहलीसाठी घेऊन जाण्याचे सांगून जो काही प्रवास व इतर खर्च होईल, त्यावर २ लाखांची सूट देण्याचे आमिष दाखवून टूर कंपनीच्या व्यवस्थापकाने एका दाम्पत्यास सुमारे आठ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित तेजस शाह (रा. ठाणे) याने जानेवारी ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत विदेशात जाण्याचा टूर प्लॅन केला. फिर्यादी दाम्पत्याचा विश्वास संपादन करून त्यांना परदेशात टूरवर जाण्यासाठी तेजसने टूर कंपनीच्या नावाने दाम्पत्याला २ लाख रुपयांचे डिस्काउंट व क्रेडिट नोट देतो, असे सांगून आमिष दाखविले.
तेजसने सांगितल्याप्रमाणे फिर्यादी दाम्पत्याने ७ लाख ९२ हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यातून रक्कम तेजसच्या खात्यावर वर्ग केली. त्यानंतर तेजसने टूरच्या तारखा वेळोवेळी बदलवून अखेर टूरला नेलेच नाही. दाम्पत्याने त्याच्याकडे विचारणा केली असता, टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशयिताने फसवणूक केल्याचे लक्षात येताच दाम्पत्याने सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ११९/२०२४)