नाशिक (प्रतिनिधी) : एचएएलमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका तरुणाला १२ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सागर बाबूराव तांबे (रा. जिव्हाळे, ता. निफाड, जि. नाशिक) हा तरुण नोकरीच्या शोधात होता. त्यावेळी आरोपी प्रशांत विजय पगारे याने फिर्यादी सागर तांबे यांच्याशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला. एचएएलमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्याला विश्वासात घेतले. या आमिषापोटी आरोपी पगारे याने तांबे याच्याकडून १२ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले; मात्र बरेच दिवस उलटूनही त्याने नोकरी मिळवून दिले नाही व पैसेही परत न करता आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. २९ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर या कालावधीत पंचवटी कॉलेजच्या परिसरात घडला.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात प्रशांत पगारेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजोळे करीत आहेत. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३३८/२०२४)