नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा…
नाशिक (प्रतिनिधी): जुने नाशिकमधील चौक मंडई येथील नुरी चौकात असलेल्या एका वाहन बाजार दुकानाला सोमवारी (दि.२२) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.
ही आग क्षणार्धात वाऱ्यासारखी पसरल्याने शेजारील भंगरमालाची दोन दुकाने व त्यापाठीमागे असलेली दोन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाच्या २० जवानांनी नऊ बंबांच्या साहाय्याने शर्थीचे प्रयत्न करीत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जुने नाशिकमधील वाकडी बारव कारंजापासून वडाळानाक्याकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर नुरी चौक आहे. हा सगळा परिसर दाट लोकवस्तीसह विविध गॅरेजेस, वेल्डिंग, ऑटोमोबाइल, रिक्षा दुरुस्ती, भंगार मालाच्या दुकानांनी व्यापलेला आहे. अत्यंत अरुंद असलेल्या या दोन्ही रस्त्यांवर दिवसभर वर्दळ असते.
नूरी चौकामध्ये उमर शेख यांचे महाराष्ट्र वाहन बाजार नावाने दुकान आहे. या दुकानात विक्रीसाठी सुमारे ५५ पेक्षा जास्त दुचाकी ठेवलेल्या होत्या. सकाळी आगीची सुरुवात या दुकानातून झाली. अग्निशमन दलाचे दोन बंब शिंगाडा तलाव मुख्यालयातून घटनास्थळी एकापाठोपाठ पोहोचले. तेव्हा हे दुकान पूर्णपणे आगीमध्ये हरविलेले होते, असे जवानांनी सांगितले. काही वेळेत या दुकानाला अगदी लागून असलेल्या प्लॅस्टिक भंगार मालाचे आदिल शेख यांच्या दुकानाला तसेच शोएब शेख यांच्या अशरफी स्पेअर पार्ट नावाच्या दुकानालाही आगीने वेढा दिला. आगीच्या ज्वाला व धुराचे लोट आकाशात प्रचंड उंचीवर उठत होते. दरम्यान, अग्निशमन जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. अतिरिक्त कुमक पाठविण्याचा ‘कॉल’ ही देण्यात आला.
स्थानिक युवक मदतीला धावले:
👉 स्थानिक युवकांकडून धावपळ करत घरातून सिलिंडर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत होते. अरुंद रस्त्यामुळे बंबांना येण्यास निर्माण झालेला अडथळा तसेच अन्य जुनाट वाहनांचा अडथळाही युवक दूर करीत होते.
👉 घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिससुद्धा घटनास्थळी पोहोचले. शासनाच्या १०८ टोल फ्री क्रमांकावरून मोफत वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या दोन रुग्णवाहिकांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
👉 पोलिसांनी बघ्यांची गर्दी पांगविल्याने आपत्कालीन कार्य वेगाने सुरळीतपणे पार पडले. युवकांनी मदतकार्यासाठी धाव घेतल्याने जवानांना आगीवर लवकर नियंत्रण मिळविणे शक्य झाले.